गरज पर्यायी शेतीची

    दिनांक :10-Jul-2019
शेती व्यवसायात चांगला नफा मिळवायचा तर पिकांची उत्पादकता अधिकाधिक कशी वाढेल यावर शेतकर्‍यांनी भर द्यायला हवा. केवळ एखाद्या वर्षापुरती उत्पादकता वाढवून उपयोग नाही. त्यामध्ये सातत्य राखणंही गरजेचं आहे. या दृष्टीकोनातून उत्पादन घ्यायचं आहे त्या पिकांचं चांगलं नियोजन केल्यास शेतकर्‍यांना निश्चित फायदा मिळू शकतो. उदाहरण द्यायचं तर दुष्काळी भागात पडीक जमिनीत पावसाच्या पाण्यावर येणारं आणि औषधी गुणधर्म असणारे पिक म्हणून गुग्गुळ या पिकाकडे पाहिलं जातं. याचा उपयोग आयुर्वेदिक आणि युनानी औषधांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. 

 
 
गुग्गुळ ही झुळुक वर्गातील वनस्पती आहे. दीड ते दोन मीटर वाढणारी, झाड बहुवर्षीय, खोड राखाडी रंगाचं असतं. मुख्य खोडापासून व जमिनीतून मोठ्या प्रमाणावर झाडाच्या फांद्या निघतात. गुग्गुळाच्या खोडावर आणि फांद्यांवर काटे असतात. जुन्या खोडापासून पातळ कागदी साल असणार्‍या फांद्या निघतात. गुग्गुळाची पानं सामान्यत: कडूिंनबाच्या पानांप्रमाणे संयुक्त आणि एकाआड एक अशी असतात. त्यांना एक ते तीन दलं असतात. मार्च, एप्रिल हा गुग्गुळाला फुले येण्याचा काळ असतो. याच्या फुलांचा रंग तांबडा असून त्यात नर, मादी असे प्रकार असतात. ही फुलं फळ पिकल्यानंतर लालसर होतात. गुग्गुळाचे झाड सात वर्षांचे झाल्यानंतर खोडातून डिंक (चिक) निघतो. कमी पाण्यावर वाढणारी वनस्पती असल्यानं दुष्काळी भागातील शेतकर्‍यांना बराच वाव आहे. गुग्गुळ डिंकाच्या स्वरूपात बाहेर पडतो. वाढती मागणी असल्याने गुग्गुळाची नैसर्गिक झुडपे कमी होत असून ती संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे गुग्गुळ लागवडीला अधिक वाव आहे. गुग्गुळाच्या डिंकात बहुपयोगी ओलिओ गम रेजिन हे द्रव आहे. त्याचप्रमाणे यामध्ये आठ प्रकारचे स्टिरॉईड आहेत. त्यापासून ॲलोपथीत अनेक औषधी फॉर्म्युले तयार केले जात आहेत.
 
गुग्गुळाचा उपयोग मज्जासंस्थेच्या अनेक विकारात केला जातो. शरीरात कोणत्याही ठिकाणी वेदना निर्माण झाल्या किंवा सूज आली तर ते विकार नाडीसंस्थेशी संबंधित असतात. त्यावेळी गुग्गुळ प्रभावी कार्य करतं. याच्या वेदनाशामक गुणानं वेदना आणि सूज कमी होते. रक्तवाहिन्या बळकट करण्यात गुग्गुळाचं कार्य अत्यंत प्रभावी आहे. त्यामुळे याचा उपयोग आमवात, अर्धांगवायू, संधिवात यामध्ये प्रामुख्याने केला जातो. याशिवाय स्थूलता कमी करण्यासाठीही उपयोग होतो. गुग्गुळ हे मधुमेहींसाठी उपयोगी औषध ठरते. याच्या झाडाला खाचा पडल्या की त्यातून चिकट पदार्थ पाझरतो. त्याला गुग्गुळ म्हणतात. हे हिवाळ्यात निघते. त्याचा फिक्कट पिवळा, तपकिरी, मळकट हिरवा अशा रंगाचे ओबड-धोबड खडे निघतात. याच्या रंगावरून पाच जाती केल्या जातात. कण गुग्गुळ राजस्थानात आढळतो. याचे हिरवट पिवळे कण मऊ असतात. वनस्पती शास्त्राच्या दृष्टीने लहान पानांच्या व मोठ्या पानाच्या अशा गुग्गुळाच्या दोन जाती सांगितल्या जातात. चांगल्या जातीची क्षमता 20 वर्षांपर्यंत असते.
 
राजस्थान, कर्नाटक, दुष्काळी पश्चिम महाराष्ट्र हा भाग गुग्गुळ पीक वाढीसाठी आणि उत्पादनास योग्य असा आहे. महाराष्ट्रात विपुल कोरड्या, माळरानावरील पडीक जमिनीत याचं पीक चांगलं येतं. याची लागवड फांद्यांच्या फाट्यापासून अथवा उती संवर्धनाने केली जाते. गुग्गुळाचे झाड उती संवर्धनाने लावल्यास तीन ते चार वर्ष जगतं. या झाडापासून रेझिन मिळू शकतं. एका झाडापासून साधारणपणे 700 ते 900 ग्रॅम इतकं रेझिन मिळू शकतं. याच्या लागवडीसाठी दोन बाय दोन अंतरावर शेत आखणी करून सात सेंटीमीटर खोली व लांबी-रुंदीचे खड्डे काढावेत. प्रत्येक खड्‌ड्यात 500 ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट तळात पसरावे. हे आंतरपीक म्हणूनही घेता येतं किंवा त्यामध्ये पाहिजे ती आंतरपीकं समाविष्ट करता येतात. त्यामुळे मिश्रशेतीसाठी अत्यंत योग्य पीक आहे.
 
गुळवेल ही परावलंबी असून त्याची वाढ गुग्गुळाच्या झाडावर चांगल्या पद्धतीने होऊ शकते. गुळवेलीतही औषधी गुणधर्म असल्याने त्यापासून शेतकर्‍यांचा निश्चित फायदा होतो. म्हणून तिला ‘अमृत गुग्गुळ’ म्हणतात. याच्या बियांची उगमक्षमता केवळ पाच टक्के एवढीच असते. पेन्सिलीच्या आकाराच्या फांद्या किंवा द्राक्षाप्रमाणे छाट कलम करूनही गुग्गुळाची लागवड करता येऊ शकते. सर्वसामान्यपणे कोणताही शेतकरी खरीप हंगामात किंवा रब्बीतही ज्वारी, बाजरी, गहू, हुलगा, मठ, तूर, उडीद अशी तीच ती पिके सातत्याने घेत राहिल्याने उत्पादनाची मूल्यवर्धी होत नाही व त्याला पाहिजे तेवढा पैसा हाती लागत नाही.
 
महाराष्ट्रात 85 टक्के क्षेत्र हे कोरडवाहू असल्याने या शेतकर्‍यांना सक्षम पर्याय दिल्याशिवाय त्यांच्या हातात पैसा खेळणार नाही. गुग्गुळासारख्या औषधी वनस्पतीकडे जगातील औषधनिर्माता कंपन्यांचे लक्ष वेधलं आहे. त्यामुळे शेतकर्‍याने त्याचा फायदा योग्य पद्धतीनं उठवणं गरजेचं आहे. महाराष्ट्रात निम्म्याहून अधिक जमिन पडिक असल्याने गुग्गुळासारखं पीक शेतकर्‍यांना समृद्धी देण्यासाठी उपकारक ठरू शकतं. याला जनावरं तोंड लावत नसल्यानं राखण करण्याचा प्रश्न येत नाही. त्याचप्रमाणे डिंक साठवता येतो. त्यामुळे गरज भासेल तेव्हा त्याची विक्री करता येऊ शकते. याला बाजारपेठही चांगली असल्यानं त्याची शेती शेतकर्‍यांना किफायतशीर आणि समृद्धी प्राप्त करून देणारी ठरेल.