फुलशेतीचा उत्तम जोडव्यवसाय

    दिनांक :10-Jul-2019
जागतिक बाजारपेठेचा विचार करायचा तर फुलांमध्ये सर्वात जास्त दबदबा केनियाचा आहे. याचं कारण या देशात फुलांचं प्रचंड प्रमाणात होणारं उत्पादन आणि स्वाभाविक जागतिक बाजारात तेवढ्याच स्वरुपात होणारी निर्यात. अशा परिस्थितीत भारत आणि इथिओपिया या देशांकडून तुलनेनं स्वस्त तसंच परवडणार्‍या दरात फुलांची आयात करणार्‍या देशांची वाढलेली अपेक्षा पूर्ण करणं गरजेचं आहे. त्यादृष्टीने भारतातील फुल उत्पादक शेतकर्‍यांना जागतिक प्रमाणकांसह फुलांचं उत्पादन करून निर्यातीच्या मोठ्या आणि शाश्वत संधी उपलब्ध होत आहेत. महाराष्ट्राचं उदाहरण घ्यायचं तर या राज्यातील शेतकर्‍यांनी उत्पादित केलेल्या विशिष्ट प्रकारच्या आणि दर्जाच्या गुलाबांच्या फुलांना व्हॅलेंटाईन डे साठी अन्य देशांमधून मोठी मागणी प्राप्त होत आहे. त्याद्वारे शेतकर्‍यांना उत्तम नफा मिळवणंही शक्य होत आहे.
 
 
 
पूर्व आफ्रिकी संस्थेच्या अहवालानुसार जागतिक फूल बाजारात केनिया, इथिओपियासह भारतासारख्या देशांनी मिळवलेले स्थान या क्षेत्रात त्या त्या देशातील शेतकर्‍यांच्या अर्थकारणास विलक्षण गती देण्यास सहाय्यभूत ठरणार आहे. केनिया इन्व्हेस्टमेंट अॅथॉरिटीचे (केनइनवेस्ट) वरिष्ठ अधिकारी मुसा इकियारा यांच्या मते, फुलांच्या जागतिक बाजारात केनियाने प्राप्त केलेलं स्थान आणि निर्माण केलेले आव्हान मोठं आहे. मात्र, इथिओपिया आणि भारतासारखे देश या क्षेत्रात अग्रेसर राहू शकतात हेही तितकंच खरं आहे. अर्थात, भारतातून होणारी फुलांची निर्यात केनियाच्या तुलनेत कमी आहे. मात्र, काही प्रमाणात का होईना त्यात होत असलेली वाढ दिलासा देणारी आहे.
 
 
 
या संदर्भात मागील आकडेवारी लक्षात घ्यायची तर 2011-2012 मध्ये पाच कोटी नऊ लाख डॉलर्स मूल्य असलेल्या विविध फुलांची वेगवेगळ्या देशांना निर्यात होऊ शकली. ही निर्यात आधीच्या वर्षाच्या तुलनेत 23.3 टक्के अधिक होती. त्यानंतरच्या काळात निर्यातीचं प्रमाण वरचेवर वाढत राहिलं. इथिओपिया या देशात 2011-2012 मध्ये 26 कोटी पाच लाख 71 हजार डॉलर्सची उलाढाल फुलांच्या व्यवसायातून झाली. ही उलाढाल आधीच्या वर्षाच्या तुलनेमध्ये (22 कोटी चार लाख डॉलर्स) 19 टक्के अधिक होती. फुलपीक विकास प्राधिकरणाच्या (एचसीडीए) माहितीनुसार 2012 मध्ये जागतिक बाजारात केनियामधून 50 कोटी तीन लाख डॉलर्स मूल्य असलेल्या फुलांची निर्यात झाली. 2011 मध्ये झालेल्या उलाढालीच्या (52 कोटी तीन लाख डॉलर्स) तुलनेत ही निर्यात चार टक्के कमी होती. 2012 मध्ये फुलांचे उत्पादन एक लाख 23 हजार टन होते. आधीच्या वर्षाच्या (2011) तुलनेत ते जास्त होते. त्यानंतरही उत्पादनात वरचेवर वाढ होत राहिली आहे.
 
या सार्‍या बाबी लक्षात घेता केवळ जागतिक पातळीवरच नव्हे तर देशांतर्गतही फुलांची मागणी वाढत चालल्याचं पहायला मिळतं. त्यामुळे हमखास उत्पन्नासाठी फुलशेतीचा पर्याय शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. देशात शेतकर्‍यांना फळबागांसाठी प्रोत्साहन देण्यात आलं. त्यासाठी आर्थिक तरतुदी करण्यात आल्या. याचा परिणाम म्हणून फळबागांच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ झाली आणि उत्पादकांना अपेक्षित उत्पन्न मिळवणं शक्य होऊ लागलं. त्याच प्रमाणे आता शेतकर्‍यांना फुलांच्या शेतीसाठी प्रोत्साहन आणि प्रसंगी अर्थसहाय्य दिलं जाण्याची आवश्यकता आहे. तसं झाल्यास या देशात फुलशेतीला मोठा वाव मिळून फुलांच्या निर्यातीस चालना मिळेल. त्याच बरोबर शेतकर्‍यांना आर्थिक लाभ होईल.