स्विस बँकेतील शेकडो खात्यांची माहिती लवकरच भारताला मिळणार

    दिनांक :10-Jul-2019
नवी दिल्ली,
स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती लवकरच उपलब्ध होणार आहे. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या करारानुसार ३० सप्टेंबरच्या आधी खातेधारकांची माहिती भारताला मिळेल. भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये ऑटोमॅटिक इक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन (एईओआय) करार झाला आहे. जुलै २०१८ मध्ये झालेल्या याच करारानुसार स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची माहिती उपलब्ध होणार आहे. 'इंडियन एक्स्प्रेस'नं याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
 
 
आम्हाला अनेकदा भारताला माहिती पाठवावी लागेल, असं स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती कर कार्यालयानं सांगितलं. त्यामुळे स्विस बँकेतील भारतीय खातेधारकांची संख्या अतिशय जास्त असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. स्विस बँकेत २०१८ च्या आधीपासून खातं असलेल्या सगळ्या खातेधारकांची माहिती भारताला मिळणार आहे. स्वित्झर्लंडच्या अर्थ मंत्रालयानं आणि मध्यवर्ती कर कार्यालयानं दिलेल्या माहितीनुसार, भारतासह एकूण ७३ देशांना स्विस बँकेतील खातेधारकांची माहिती दिली जाईल. या सर्व देशांसोबत स्वित्झर्लंड सरकारनं ऑटोमॅटिक इक्स्चेंज ऑफ इन्फॉर्मेशन करार केला आहे.
स्विस बँकेतील खातेधारकांची माहिती संबंधित देशाला देण्यापूर्वी संसदीय प्रक्रिया पूर्ण करावी लागते. भारतीय खातेधारकांच्याबाबत ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्याचं स्विस प्रशासनानं सांगितलं. त्यामुळे सप्टेंबरच्या अखेरपर्यंत शेकडो खातेधारकांची माहिती भारताला मिळेल. यामुळे भारत आणि स्वित्झर्लंडचे संबंध एका नव्या उंचीवर जाऊन पोहोचतील, असा विश्वास स्विस अर्थ मंत्रालयाच्या प्रवक्तांनी व्यक्त केला. स्विस सरकारकडून खातेधारकांची माहिती मिळणार असल्याच्या वृत्ताला दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीदेखील दुजोरा दिला.