भाजपाच्या निलंबित आमदाराचे बंदुका घेऊन नृत्य

    दिनांक :10-Jul-2019
- पक्षाने घेतली गंभीर दखल
डेहराडून,
उत्तराखंडमधील वादग्रस्त भाजपा आमदार प्रणविंसह चॅम्पिअन हे बेशिस्त आणि गैरवर्तवणुकीमुळे आधीच पक्षातून निलंबित आहेत. मात्र, यावेळी ते हातात दारूचा प्याला आणि बंदूक घेऊन बॉलीवूडच्या गाण्यावर नृत्य केल्याने चर्चेत आले आहेत. त्यांची ही चित्रफीत चांगलीच व्हायरल झाली आहे.
 
 
 
व्हायरल झालेल्या चित्रफितीमध्ये प्रणविंसह हातात बंदूक घेऊन नाचताना दिसत आहेत. पायावरील शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रणविंसह आपल्या घरी परतले होते. आपल्या समर्थकांसह याचाच आनंद ते साजरा करीत होते. नाचताना प्रणविंसह यांनी चार बंदुका हातात घेतल्या होत्या. यावेळी त्यांचे समर्थकही कौतुक करताना दिसून येतात. उत्तराखंडमध्ये हे फक्त तुम्हीच करु शकता, असे ते म्हणत आहेत. आपल्या समर्थकांना उत्तर देताना, फक्त उत्तराखंड नाही, तर भारतात असे कोणी करू शकत नाही, असे प्रणविंसह म्हणतात.
 
दरम्यान, भाजपाने प्रणविंसह यांच्या व्हिडीओची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांच्यावर पूर्वीच तीन महिन्यांच्या निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. आता, चर्चा करून काय कारवाई करता येईल यासंबंधी निर्णय घेण्यात येणार आहे, असे पक्षसूत्रांनी वृत्तसंस्थेस सांगितले. काही दिवसांपूर्वी प्रणविंसह यांचा एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी देणारा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यासंबंधी पत्रकाराने पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. उत्तराखंडचे भाजपा प्रदेशाध्यक्ष नरेश बन्सल यांनी तक्रारीची दखल घेत प्रणविंसह यांना तीन महिन्यांसाठी निलंबित केले होते.