फुटीरतावादी अंद्राबीच्या घराला टाळे

    दिनांक :10-Jul-2019
- दहशतवादाला निधी पुरवठाप्रकरणी एनआयएची कारवाई
श्रीनगर,
जम्मू-काश्मीरमधील फुटिरतावादी महिला नेता आणि दुख्तरान-ए-मिल्लतची प्रमुख आसिया अंद्राबी हिच्या श्रीनगर येथील घराला टाळे लावण्यात आले आहे. दहशतवादाला अर्थपुरवठा केल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ही कारवाई केली आहे. त्यामुळे आता चौकशी पूर्ण होईपर्यंत अंद्राबी आपले घर विकू शकणार नाही वा त्याचा वापर व्यावसायिक कारणांसाठी करू शकणार नाही.
 

 
 
दरम्यान, सध्या कोठडीत असलेल्या अंद्राबीची तुरुंगातून सुटका झाली, तर मात्र ती आपल्या घरात राहू शकते. अंद्राबी सध्या एनआयएच्या कोठडीत आहे. काश्मीर खोर्‍यात दुख्तरान-ए-मिल्लत या संघटनेकडून महिलांचे आंदोलन घडवून आणण्यासाठी पाकिस्तानातून पैसा मिळत होता, याची कबुली तिने दिली आहे.
मुंबई स्फोटाचा सूत्रधार हाफिज सईदच्या आदेशानुसार, काश्मीर खोर्‍यात भारतीय जवानांवर दगडफेक घडवून आणल्याचा आरोपही अंद्राबीवर आहे. काश्मीर विद्यापीठातून विज्ञान शाखेची पदवी घेतलेली अंद्राबी ही चार वर्षांपूर्वी पाकिस्तानी झेंडा फडकावणे आणि पाकिस्तानी राष्ट्रगीत गायल्यामुळे चर्चेत आली होती.
आसिया अंद्राबीच्या दोन मुलांपैकी एक मलेशियात, तर दुसरा ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहे. अंद्राबीचा भाचा पाकिस्तानी सैन्यात कॅप्टन आहे, तर तिचा एक नातेवाईक पाकिस्तानी सैन्य आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआयचा हस्तक आहे.