धोनी, जडेजाची झुंज अपयशी; भारताचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात

    दिनांक :10-Jul-2019
मँचेस्टर,
अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्यात न्यूझीलंड संघाने भारतीय संघाचा १८ धावांनी पराभव केला. या विजयाने भारताचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले असून न्यूझीलंड संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. या सामन्यात रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनी यांनी अखेरच्या षटकांमध्ये सामन्यात रंग भरले. पण जडेजा आणि धोनी यांना भारताला विजय मिळवून देता आला नाही.    

उत्तम अष्टपैलू खेळाडू कसा असावा, याचा नमुना रवींद्र जडेजाने न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दाखवून दिला. कारण जडेजाने चांगली गोलंदाजी केली, उत्तम क्षेत्ररक्षण केले आणि लाजवाब फलंदाजी करत त्याने भारताच्या बाजूने सामना झुकवण्याचा प्रयत्न केला. जडेजा आणि धोनी यांनी शतकी भागीदारी रचली आणि भारताचे आव्हान जीवंत ठेवले.
न्यूझीलंडच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात दयनीय झाली. भारताने आपले पहिले तिन्ही फलंदाज फक्त पाच धावांमध्ये गमावले होते. रोहित शर्मा, विराट कोहली आणि लोकेश राहुल यांना प्रत्येकी एक धावच करता आली. त्यानंतरही दिनेश कार्तिकही स्वस्तात बाद झाला. पण त्यानंतर रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांनी काही काळ फलंदाजी करत भारताला स्थैर्य मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण दोघांनीही ऐन वेळी कच खाल्ली. स्थिरस्थावर झाल्यावर मोठे फटके मारण्याच्या नादात या दोघांनी आपली विकेट गमावली. पण त्यानंतर मात्र महेंद्रसिंग धोनीसह रवींद्र जडेजा यांनी डावाची उत्तम बांधणी करत सामना रंगतदार अवस्थेत आणला. जडेजाने ५९ चेंडूंत प्रत्येकी चार षटकार आणि चौकार लगावत ७७ धावा केल्या. धोनीनेही ५० धावांची खेळी साकारली.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील उपांत्य फेरीचा सामना पावसामुळे राखीव दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात आला. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 46.1 षटकांत 5 बाद 211 धावा केल्या. त्यानंतर पावसानेच दमदार बॅटींग केली. बराच वेळ वाट पाहूनही पावसाचा जोर कायम राहिल्याने अखेरीस उपांत्य फेरीचा सामना राखीव दिवशी खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज 46.1 षटकापासूनच सामन्याला सुरुवात झाली. न्यूझीलंडने भारतासमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार केन विलियम्सन आणि रॉय टेलर यांनी अर्धशतकी खेळी केली. विलियम्सनने 95 चेंडूंत 67 धावा केल्या. टेलरने 90 चेंडूंत 74 धावा केल्या.
बुधवारचा खेळ सुरू झाला तेव्हा किवी मोठी धावसंख्या उभारतील असे वाटले होते, परंतु रवींद्र जडेजाने त्यांना रोखले. रॉस टेलरला धावबाद केल्यानंतर जडेजाने किवींना आणखी एक धक्का दिला, भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर त्याने टॉम लॅथमचा सुरेख झेल टिपला. त्यामुळे किवींना फार काही करता आले नाही. भुवीनं 10 षटकांत 43 धावा देत तीन विकेट घेतल्या.