रेल्वे तिकिटांचेही अनुदान सोडता येणार

    दिनांक :10-Jul-2019
आता एलपीजी सिलेंडर प्रमाणेच रेल्वे तिकिटांवर मिळणारे अनुदानही सोडता येणार आहे. रेल्वेचे तिकीट आरक्षित करताना अनुदान सोडण्याबाबत विचारले जाणार आहे. दरम्यान, तिकिटांवरील अनुदान अंशत: अथवा पूर्णत: सोडता येणार आहे. हा प्रस्ताव सध्या अखेरच्या टप्प्यात आहे. केंद्र सरकारच्या 100 दिवसांच्या अजेंड्या अंतर्गत ही योजना लागू केली जाणार आहे.
 
 
दरम्यान, या अंतर्गत रेल्वे आपल्या प्रवाशांना तिकिटांवर मिळणारे अनुदान सोडण्याची विनंती करणार आहे. अनुदान सोडल्यानंतर तिकिटाच्या दरावर त्याचा परिणाम होणार आहे. तिकिटाच्या दरावर प्रवाशांना किती टक्के अनुदान देण्यात येते याचा उल्लेख छापील तिकिटांवर करण्यात येतो. सध्या रेल्वे प्रत्येक प्रवाशाला 43 तिकीट दरावर 43 टक्के अनुदान देत आहे.
यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅसवरील अनुदान सोडण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर अनेकांनी गॅसवर मिळणारे अनुदान सोडले होते. यामुळे केंद्र सरकारची कोट्यवधी रूपयांची बचत झाली होती. तसेच हे अनुदान सोडल्यानंतर गावातील एका कुटुंबाला गॅस सिलेंडर मिळेल, असे सरकारकडून सांगण्यात आले होते. दरम्यान, रेल्वे तिकिटांवरील सोडण्यात येणाऱ्या अनुदानाचा उपयोग रेल्वेमध्ये मिळणाऱ्या सुविधा वाढवण्यासाठी आणि अधिक उत्तम करण्यासाठी करण्यात येणार आहे.