सुर्यमाले बाहेरील ग्रहाच्या वातावरणाची रचना समजण्यात यश

    दिनांक :11-Jul-2019
वॉशिंग्टन,
अमेरिकेच्या “नासा’ या अवकाश संशोधन संस्थेने आपल्या सुर्यमाले बाहेरील ग्लिस 3470 बी या ग्रहावरील वातावरणाची रासायनिक रचना समजून घेण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे या ग्रहाचे स्वरूप आणि त्याची निर्मिती कशी झाली यावर प्रकाश पडू शकतो. 
 
 
“ग्लिस 3470 बी’ या ग्रहाचा आकार पृथ्वी आणि नेपच्यूनच्या दरम्यानचा आहे. त्याचा पृष्ठभाग पृथ्वीप्रमाणेच खडकाळ असून त्याभोवती हायड्रोजन आणि हेलियमचे वातावरण आहे. या ग्रहाचे वस्तुमान पृथ्वीपेक्षा अधिक व नेपच्यूनपेक्षा कमी आहे. तो आपल्या ताऱ्याच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालतो.
या संदर्भातील माहिती कॅनडातील मॉंट्रियल विद्यापीठाच्या बिजोर्न बेनेक यांनी दिली आहे. या ग्रहाची बारा अधिक्रमणे आणि 20 ग्रहणे तपासून पाहण्यात आली. कुठल्याही ग्रहाची वर्णपंक्‍तीय वैशिष्ट्‌ये प्रथमच यानिमित्ताने शोधण्यात आली आहेत. या ग्रहाच्या वातावरणात जड मूलद्रव्यांचा समावेश आहे. त्याच्या वातावरणात अगदी ग्रहाच्या निर्मितीच्या वेळेपासूनचा हायड्रोजन आहे. त्यातच तो आपल्या ताऱ्याच्या अगदी जवळून प्रदक्षिणा घालत असल्याने त्याच्यावर जिवसृष्टी असण्याची शक्‍यता खूप कमी आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्पित्झर आणि हबल या अंतराळ दुर्बिणींच्या सहाय्याने हे संशोधन करण्यात आले.