महिलेसोबत असभ्य वर्तन करणारा अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू संघाबाहेर

    दिनांक :11-Jul-2019
लंडन, 
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील एकेका घटनांचा आता हळूहळू उलगडा होऊ लागला आहे. प्राप्त माहितीनुसार हॉटेलमध्ये महिलेसोबत असभ्य वर्तन करणार्‍या अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या एका क्रिकेटपटूला आयसीसीच्या निर्देशानुसार एक वर्षासाठी राष्ट्रीय संघाच्या बाहेर करण्यात आले आहे. 

 
 
क्रिकेटचे आंतरराष्ट्रीय स्तरावर संचालन करणार्‍या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेतर्फे (आयसीसी) खेळाडूच्या चुकीबद्दल आधी स्पष्ट माहिती देण्यात आलेली नव्हती. विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ मायदेशी परतल्यावर त्या क्रिकेटपटूशी या विषयावर चर्चा करण्यात आली. अफगाणिस्तानच्या क्रिकेट मंडळाने नंतर आयसीसीसोबतही या विषयावर चर्चा केली. त्यानंतर आयसीसीने क्रिकेट मंडळाला सर्व माहिती स्पष्टपणे सांगितल्यानंतर त्या खेळाडूला एक वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे. हा खेळाडू म्हणजे अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज आफताब आलम आहे. आयसीसीने दिलेल्या निर्देशावरून अफगाणिस्तान क्रिकेट मंडळाने आफताबला संघाबाहेर ठेवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या काळात त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळता येणार नाही. हा कठोर निर्णय घेताना मंडळाने त्याच्यासोबतचा वर्षभराचा करारही संपुष्टात आणल्यामुळे मंडळातर्फे त्याला देण्यात येणारे नियमित भत्ते आणि शुल्कही बंद करण्यात येणार आहे.
 
प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार आफताब आलम याने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेदरम्यान हॉटेलमधील एका पाहुण्या महिलेसोबत असभ्य वर्तन केल्यामुळे त्याला मायदेशी पाठविण्यात आले होते. ही घटना अफगाणिस्तानचा मुक्काम असलेल्या साऊदम्पटन येथील एका हॉटेलमधील आहे. सुरुवातीला आयसीसी सांगितले होते की, विशेष परिस्थितीमुळे त्याची रवानगी मायदेशी करण्यात आली आहे आणि अफगाणिस्तानने म्हटले होते की, आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्यामुळे त्याला अफगाणिस्तानला परत पाठविण्यात आले होते.
 
महिलेसोबतच्या असभ्य वर्तनाप्रमाणेच आफताब आलम भारत-पाकिस्तान सामनादरम्यानही वादात अडकला होता. त्याला सुरक्षा कर्मचार्‍यांनी एका विशेष कक्षात घुसखोरी केल्यामुळे तेथून हाकलले होते. त्यानंतर अफगाणिस्तान क्रिकेट मंडळानेही त्याला फटकार लगावली होती. एवढेच नव्हे तर संघ व्यवस्थापक नावेद सईम यालाही निलंबित करण्यात आले होते. या घटनेच्या चौकशीसाठी समितीही स्थापन करण्यात आली होती. समितीचा अहवाल सार्वजनिक झाल्यानंतर आलमला संघातून निलंबित करण्यात आले होते. सईमने घटनेची योग्य माहिती न दिल्यामुळे त्याला दोषी ठरविण्यात आले होते. माहिती क्रिकेट मंडळापासून लपवून ठेवल्याचा आरोपही त्याच्यावर लावण्यात आला होता.
 
आलम विश्वचषकातील शेवटचा सामना 22 जून रोजी भारताविरुद्ध खेळला होता. त्यावेळी त्याने एक फलंदाजही बाद केला होता. आयसीसीच्या भ‘ष्टाचार विरोधी पथकाने 23 जून रोजी चौकशीसाठी त्याला बोलाविले असता तो आला नाही. तो हॉटेलमधील आपल्या खोलीत नव्हता, तर कोणालाही न सांगता तो लंडनमधील आपल्या एका नातेवाईकाकडे निघून गेला होता. तेव्हाही त्याला प्रशिक्षक फिल सिमन्स यांनी दोन सामन्यांसाठी निलंबित केले होते.
 
यंदाच्या आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानची कामगिरी अतिशय टुकार झाली. सर्वच्या सर्व नऊही साखळी सामन्यांमध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला. शिवाय त्यांचे काही खेळाडूही वादाच्या भोवर्‍यात अडकले होते. मोहम्मद शहजाद यालाही मायदेशी पाठविण्यावरून वाद झाला होता.