काँग्रेससाठी कठीण काळ, पुनरुज्जीवन आवश्यक : ज्योतिरादित्य शिंदे

    दिनांक :11-Jul-2019
भोपाळ, 
सध्याचा काळ काँग्रेससाठी अतिशय कठीण आहे. पक्षात आणि कार्यकर्त्यांमध्ये तातडीने जोश निर्माण करणे आवश्यक आहे आणि अशी क्षमता असलेल्या व्यक्तीकडेच पक्षाध्यक्षपदाची धुरा सोपवावी लागणार आहे, असे मत पक्षाचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज गुरुवारी येथे व्यक्त केले. 
 
 
राहुल गांधी आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. त्यामुळे पक्षात आता कोणती भूमिका पार पाडावी, हा निर्णयही त्यांनाच घ्यायचा आहे. ते राजीनामा देतील, असा विचार आम्ही स्वप्नातही केला नव्हता. पक्षाला आणि देशाला त्यांची गरज आहे, असे शिंदे यांनी पत्रपरिषदेत सांगितले.
 
राहुल गांधी यांनीच पक्षाचे नेतृत्व करावे, यासाठी सर्वच प्रकारे प्रयत्न करण्यात आले, पण ते अपयशी ठरले. आता पक्षाच्या नव्या अध्यक्षाचा तातडीने शोध घ्यावा लागणार आहे. आधीच प्रचंड वेळ वाया गेला आहे, आता आणखी वेळ जायला नको, असे आपल्या पारंपरिक गुना मतदारसंघात पराभूत झालेले शिंदे म्हणाले.
 
पक्षाच्या नव्या रचनेत राहुल गांधी यांची भूमिका काय राहणार आहे, असे विचारले असता, पक्षात कोणती जबाबदारी पार पाडायची, हा निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे. त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, अशी सर्वांचीच इच्छा आहे, पण अंतिम निर्णय त्यांनाच घ्यायचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.