कोळसा चोरीप्रकरणी आयकर विभागाची धाड

    दिनांक :11-Jul-2019
*कोळसा व्यापार्‍यांचे घर, कार्यालय आणि कोळसा डेपोची कसून चौकशी
*मित्तल, छाबडा, उपरे, अग्रवाल हे आहेत व्यापारी
 
चंद्रपूर,
शेकडो कोटींच्या कोळसा चोरीप्रकरणी आयकर विभागाने गुरूवार, 11 जुलै रोजी चंद्रपुरातील कोळसा व्यापार्‍यांच्या घरी, त्यांच्या कार्यालयात आणि कोळसा डेपोंवर धाडी टाकल्या. या धाडसत्रामुळे कोळसा व्यापार्‍यांमध्ये खळबळ माजली आहे. कायम वादग्रस्त राहिलेल्या स्वामी फ्युएल कंपनीच्या संचालकांच्या घरी धाडी पडल्याने, पुन्हा एकदा शाम मित्तल, रणजित छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल हे व्यापारी अडचणीत आले आहे. वृत्त लिहेस्तोवर चौकशी सुरू होती. गतवर्षी यातील एका भागीदाराकडे कार्यरत कर्मचार्‍याने कोळश्याच्या गैरव्यवहारासंदर्भात आत्महत्या केली होती, हे उल्लेखनीय.
 

 
 
खाणीतून कोळसा चोरीचे प्रमाण एव्हाना मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. अशा तक्रारींकडे आयकर विभागाचीही नजर होतीच. गुरूवारी आयकर विभागाच्या आठ-नऊ पथकांनी जिल्हात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या. त्यात महानगरातील चार प्रमुख कोळसा व्यापार्‍यांचा समावेश असून, त्यात शाम मित्तल, रणजित छाबडा, नितीन उपरे, संदीप अग्रवाल यांचा समावेश आहे. या चौघांच्याही घरांवर आणि कार्यालयांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. यासोबतच नागाळा येथील कोळसा डेपो आणि ताडाळी येथील विमला रेल्वे सायडिंगवरही धाड टाकण्यात आली आहे.
 
या कारवाईसाठी सुमारे 80 ते 90 जणांची चमू येथे दाखल झाली असून, स्वतंत्र पथक तयार करून त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या. सर्व ठिकाणी कसून झडती घेतली जात असून, चौकशी सुरू आहे. चौकशीत आणखी काही प्रतिष्ठित व्यापार्‍यांची नावे समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरातील कोळसा तस्कारांचे धाबे दणाणले आहे.
गतवर्षी अशाच प्रकरणात, वडगाव परिसरातील अशोक अग्रवाल या युवकाने शुक्रवारी त्याच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. अशोक अग्रवाल काम करीत असलेल्या स्वामी फ्युल कंपनीच्याच चार भागीदार कोळसा व्यापारी, संदीप अग्रवाल, ओमप्रकाश अग्रवाल, रंजित छाबडा, नितीन उपरे यांच्याविरुध्द रामनगर पोलिसांनी 28 जुलै 2018 च्या रात्री भादंवि 306, 201, 24 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. ती केवळ आत्महत्या नसून, स्वामी फ्युल कंपनीतील मोठ्या रकमेच्या घोटाळ्याचा विषय असल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली होती.
 
चंद्रपूर महानगराला ‘ब्लॅक गोल्ड सिटी’ असेही म्हणतात. कारण या परिसरात तब्बल 29 कोळसा खाणी आहेत. यातील 17 खाणी भूगर्भावर असून, 12 खाणी भूमिगत आहेत. खरे तर, संपन्नतेचे साधन ठरणे अपेक्षित असलेला हा कोळसा आता लोकांच्या जीवावरच उठला. आरोग्याच्या समस्यांनी लोक वैतागले आहेच. पण या खाणींमुळे कायदा व सुव्यवस्थेचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या भागात खाणी आहेत, ते घुग्गुस, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, राजुरा, गडचांदूर परिसरातल्या जनसामान्यांचा विकास होणे अपेक्षित होते. परंतु, या जिल्ह्याचा मानव विकास सूचकांक हा महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी सर्वात खालच्या 10 जिल्ह्यांमध्ये येतो. त्यामुळे या खाणींमुळे जनसामान्यांची नव्हे, तर अशा कोळश्या व्यापार्‍यांचीच घरे भरली जात आहे.
 
25 जानेवारी रोजी शस्त्राच्या धाकावर वेकोलिची पैनगंगा कोळसा खाण लुटल्याची नाट्यमय घडामोड पुढे आली होती. वेकोलित कार्यरत कर्मचार्‍यांच्या संगनमताने सातत्याने कोळसा चोरी होत असल्याचे उघड झाले. तेव्हा जवळपास 17 जणांना अटक करण्यात आली. 1 लाख 89 हजार रूपयाचा कोळसा चोरीला गेला.
या अवैध धंद्यावर वर्चस्व कुणाचे या प्रश्नाने, काही वर्षाअगोदर घुग्गुस परिसरात तिरूपती पॉल आणि नंदू सुर या दोन नेत्यांचे जीव घेतले होते. ती गँगवारचीच नांदी होती. आज प्रत्यक्ष ती स्थिती समोर आली आहे. जे लोक या धंद्यात आहेत, ते आता पैशाने गब्बर झाले आहेत. ज्या तिरूपती पॉलची हत्या झाली, त्यांचे मारेकरी अवघ्या वर्षभरात 25 कोटीचे मालक झाल्याची धक्कादायक माहिती आहे.