मेरी कोमकडून प्रेरणा मिळते : छेत्री

    दिनांक :11-Jul-2019

नवी दिल्ली,
देशातील अग्रणी महिला बॉक्सर एमसी मेरी कोम हिच्यापासूनच मला चांगल्या कामगिरीची प्रेरणा मिळत असते, असे प्रतिपादन भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने केले आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावरच त्याने वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटूचा सन्मान प्राप्त केला आहे. अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने मंगळवारी आपल्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा केली, यात छेत्रीची वर्षातील सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू म्हणून निवड करण्यात आली. छेत्रीने हा पुरस्कार सहाव्यांदा आपल्या नावे केला आहे. 

 
 
हा पुरस्कारला मला आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरित करीत असतो आणि मला आपल्या जबाबदारीची जाणीव करून देतो. यंदाही हा पुरस्कार मला मिळेल, याचा मी विचारही केला नव्हता. कठोर परिश्रम करणे आणि देशासाठी खेळताना चांगल्यात चांगली कामगिरी बजावणे याकडे माझे जास्त लक्ष असते. मी आतापर्यंत शंभरपेक्षा जास्त सामने खेळले आहेत, त्यात असं‘य गोल नोंदविले आहे. सहाव्यांदा या पुरस्काराची माझी निवड होईल, असे मला अजीबात वाटले नव्हते, असेही छेत्री या पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर म्हणाला.
 
आतापर्यंत 70 आंतरराष्ट्रीय गोल केलेला हा स्टार फुटबॉलपटू मेरी कोमचा चाहता आहे. ज्या ज्या दिग्गजांनी आपापल्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे, त्या सर्वांकडूनही मला प्रेरणा मिळत असते. मेरी कोम त्यापैकी एक आहे. तिच्या संघर्षाची एक कथा आहे, असे सांगून छेत्री म्हणाला की, तिने सहा वेळा विश्व विजेतेपद पटकाविले आहे. दोन मुलांची आई असूनही विश्वविजेता होणे, ही काही साधारण बाब नाही. याशिवाय तिच्याकडे एकूण 14 सुवर्णपदके आहेत. अशा परिस्थितीत ती देशातील खेळाडूंना प्रेरित करणार नाही तर कोण करणार आहे. मी तिचा खूप मोठा चाहता आहे.
 
फुटबॉल खेळातील ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि लियोनेल मेस्सी हे माझे आदर्श आणि प्रेरणास्रोत आहेत. गेल्या दहा-बारा वर्षांपासून या दोन्ही खेळाडूंनी फुटबॉल विश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे, असेही त्याने एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.