नदाल-फेडरर उपांत्य फेरीत झुंजणार

    दिनांक :11-Jul-2019
 
लंडन,
वर्षातील तिसर्‍या ग्रॅण्डस्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारा स्वित्झर्लंडचा दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर याची या सामन्यात स्पेनचा महान खेळाडू राफेल नदालसोबत गाठ पडणार आहे. फेडररने एका संघर्षपूर्ण उपांत्यपूर्व सामन्यात जपानच्या केई निशिकोरीचे आव्हान 4-6, 6-1, 6-4, 6-4 असे मोडून काढले. 
 
 
नदाललाही आपला उपांत्यपूर्व सामना जिंकण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागला. पहिल्या सेटमध्ये अमेरिकेच्या सॅम क्वेरी यांनी चांगलेच झुंजविल्यानंतर अखेर नदालला ही लढत 7-5, 6-2, 6-2 अशी जिंकता आली आणि उपांत्य फेरी गाठता आली.
विम्बल्डन स्पर्धेच्या इतिहासात 2008 सालानंतर ही पहिली वेळ आहे की फेडरर आणि नदाल यांच्यात पुरुष एकेरीचा उपांत्य सामना होणार आहे. या वर्षीच्या दुसर्‍या ग्रॅण्डस्लॅम म्हणजे फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतही दोघे आमने-सामने उभे ठाकले होते आणि त्यात स्पेनच्या खेळाडूने बाजी मारली होती.
 
काल आपला उपांत्यपूर्व सामना जिंकून फेडररने विम्बल्डन स्पर्धेत आपल्या शंभराव्या विजयाची नोंद केली. त्याने आपल्या कारकीर्दीतील सर्वाधिक ग्रॅण्डस्लॅम विजेतेपद याच स्पर्धेत पटकाविले आहे. याआधीही या स्पर्धेत जेव्हा हे दोन दिग्गज आपसात झुंजले होते तेव्हा सामना चांगलाच रंगतदार झाला होता. त्यावेळीही नदालने पाच सेट्‌सच्या कठोर परिश्रमानंतर 6-4, 6-4, 6-7, 6-7 व 9-7 असा विजय मिळविला होता. फेडररने आतापर्यंत आठ वेळा विम्बल्डन स्पर्धा जिंकलेली आहे. एवढेच नव्हे तर 2006 आणि 2007 साली त्याने अंतिम सामन्यात नदालला नमविले आहे.
 
सर्बियाचा स्टार खेळाडू नोवाक जोकोविच यानेही पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक दिली आहे. त्याने आपल्या उपांत्यपूर्व सामन्यात बेल्जियमच्या डेव्हिड गोफिन याचे आव्हान 6-4, 6-0, 6-2 असे सहज मोडून काढले. त्याचा उपांत्य सामना स्पेनच्या रॉबर्टो बाऊतिस्ता ऑगुस्टाविरुद्ध होणार आहे. ऑगुस्टाने अर्जेंटिनाच्या गुईडो फेल्लो याला 7-5, 6-4, 3-6, 6-3 असे नमवून पुरुष एकेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे.