पाकिस्तानमध्ये न्यूज अँकरची गोळ्या झाडून हत्या

    दिनांक :11-Jul-2019
कराची,
पाकिस्तानात न्यूज चॅनलमध्ये काम करणाऱ्या एका पत्रकाराची मंगळवार संध्याकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. कराची शहरातील ख्याबन-ए-बुखारी परिसरात एका स्थानिक कॅफेच्या बाहेर न्यूज अँकर मुरीद अब्बास यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या हल्ल्‌यात मुरीद अब्बास याचा मृत्यू झाला आहे. मुरीद अब्बास हे बोल न्यूज सोबत काम करत होते. मीडिया रिपोर्टसनुसार, पोलिसांनी सांगितले की, आरोपीने एका पांढऱ्या रंगाच्या कारमधून मुरीद अब्बास याच्यावर गोळ्या झाडल्या. आरोपीची ओळख आतिफ जमान नावाने झाली आहे.

 
स्थानीक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहिती नुसार अब्बासचे पैशांच्या देवाण-घेवणीवरुन काही जणांसोबत वाद सुरू होता. जिन्ना पोस्ट ग्रॅज्युएशन मेडिकल सेंटर (जेपीएमसी) चे कार्यकारी निर्देशक सीमिन जमाली यांनी सांगितले की, अँकर अब्बास याला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले असून त्याच्या छाती आणि पोटावर गोळी लागल्याच्या जखमा होत्या. या गोळीबारात अँकर अब्बासचा मित्र खिजार हयात याला सुद्धा गोळी लागली असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा सुद्धा मृत्यू झाला.