तेव्हा नरसिंहराव गाढ झोपेत होते...!

    दिनांक :11-Jul-2019
सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकातील गौप्यस्फोट 

 
 
नवी दिल्ली,
6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येत बाबरी मशिदीचा ढाचा जमीनदोस्त केला जात होता. अंतर्गत सुरक्षेचे प्रभारी म्हणून राजेश पायलट, अयोध्येतील घडामोडी थांबविल्या जाव्या, यासाठी तत्कालीन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते, पण त्यावेळी नरसिंहराव गाढ झोपेत होते!
 
नरसिंहराव सरकारमध्ये कनिष्ठ मंत्री असलेले काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांच्या ‘व्हिजिबल मुस्लिम, इव्हिजिबल सिटीझन : अंडरस्टॅण्डिंग इस्लाम इन इंडियन डेमोक्रसी' या नव्या पुस्तकात हा गौप्यस्फोट करण्यात आला आहे.
 
बाबरीच्या विध्वंसानंतर देशाच्या विविध भागांमध्ये जातीय दंगली उसळल्या होत्या. या घटनेने देशातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते, असे माझे मत होते. त्यादिवशी मी राजेश पायलट यांची भेट घेतली. बाबरीच्या सभोवताल गर्दी सातत्याने वाढतच असल्याने, अंतर्गत सुरक्षा प्रभारी या नात्याने आपणच आता काहीतरी करा, अशी विनंती मी पायलट यांना केली आणि ते तयारही झाले. कुणीतरी एकाने नरसिंहराव यांची भेट घ्यायची आणि अन्य मंत्र्याने फैजाबादला जावे, असे ठरले होते. मी सी. के. जाफर शरीफ यांच्या निवासस्थानी गेलो आणि पंतप्रधानांना फोन लावण्याचे आवाहन केले. त्यांनी लगेच फोन केला. त्यावर नरसिंहराव म्हणाले की, आम्ही तत्कालीन मुख्य सचिव ए. एन. वर्मा यांच्याशी संपर्क साधावा, अशी आठवण खुर्शीद यांनी या पुस्तकात करून दिली. उद्या शुक्रवारी हे पुस्तक प्रकाशित होणार आहे.
 
वर्मा यांच्यापुढेही काही प्रश्न उपस्थित झाले होते. आपण तातडीने अयोध्येला जायला हवे काय, याबाबतचा निर्णय ते तत्काळ घेऊ शकले नव्हते. त्यामुळे मी पुन्हा पायलट यांच्याकडे गेलो आणि आपली जबाबदारी कशी पार पाडायची, यावर चर्चा केली. यानंतर शरीफ यांच्या निवासस्थानी अंतिम चर्चा झाली. यानंतर पायलट नरसिंहराव यांच्या निवासस्थानी गेले, पण ते झोपले होते. दुसर्‍या दिवशी निमलष्करी दलाच्या जवानांनी गर्दी हटवली होती, पण तोपर्यंत बाबरीचा विध्वंस झाला होता. यामुळे हा फार मोठ्या कटाचाच एक भाग असल्याचे स्पष्ट होते, असे त्यांनी या पुस्तकात नमूद केले.