खटल्यातील नाती

    दिनांक :11-Jul-2019
अंजली आवारी
‘खटला!’ हा शब्द ऐकला की आपल्यासमोर संपूर्ण न्यायव्यवस्था उभी ढाळते. काळे कोट घातलेले वकील, ऑर्डर ऑर्डर करणारे न्यायाधीश, न्यायासाठी फिर्याद करणारे लोक, पोलिस कोठडीत असलेले आरोपी व सतत डोळ्यांवर पट्टी बांधून न्याय करणारी ती न्यायदेवता! असं चित्र डोळ्यांसमोर येतं. भारतीय न्यायव्यवस्था ही सार्वभौम व स्वतंत्र आहे. त्यामुळे तिच्यावर विश्वास ठेऊन प्रत्येक व्यक्ती न्यायाची मागणी करीत असतो.
 
असं म्हणतात, शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. पण, आज प्रत्येकावरच कोर्टात जाण्याची वेळ आलेली दिसते. प्रत्येक घरात संपत्तीसाठी वाद सुरू आहेत. भावा-बहिणींचे वाद, बहिणी-बहिणींचे वाद, मुलगा व वडिलांचे वाद, आई व मुलांचे वाद या वादामुळे नाती तुटत चाललीय्‌. आपण यातून संपत्तीतर प्राप्त करतोय्‌ पण नात्यातील गोडवा हरवत चालला आहे. आपल्या आयुष्यात खरच संपत्ती इतकी महत्त्वाची आहे का, की आपण त्यासाठी आपली नाती पणाला लावतोय्‌. या सर्व नादात आपण एकमेकांना दुखावतोय्‌. एकमेकांच्या विरुद्ध दिशेने तोंड करून आयुष्य जगतोय्‌. कधी काळी आपली ताकत असलेले आपले कुटुंब आज आपली कमजोरी होताना दिसतेय्‌. 

 
 
‘संपत्ती’ मिळतेय्‌ हे खरंय्‌, ती गरजेची सुद्धा आहे. पण, त्याबदल्यात आपण काय गमावतोय्‌, याची जाण आपल्याला नाही. एकदा केस कोर्टात उभी राहिल्यावर ती कित्येक वर्षे चालते. त्यानंतरही निकाल आपल्या बाजूने लागेलच याची शाश्वती नसते. मग हे प्रश्न सामंजस्याने सोडवले तर काय फरक पडतो. काही खटल्यात खटला उभा राहण्याचं मुख्य कारण, हे हिरावलेले हक्क नसून आपला आडवा आलेला ‘इगो’(गर्व) असतो.
 
जेव्हापासून मुलींना वडिलांच्या संपत्तीत हक्क प्राप्त झालाय्‌, तेव्हापासून संपत्तीसाठीच्या केसेस मोठ्या प्रमाणात उभ्या राहत आहेत. आयुष्यभराचं असलेलं भावा-बहिनींचं नातं इथे तुटताना दिसतंय्‌. इथे सामंजस्यपूर्वक एक तोडगा काढता येतो. ज्या बहिणी गरीब आहेत, त्यांना भावांनी स्वत:हून संपत्तीत वाटा द्यावा. जे भाऊ गरीब आहेत त्यांच्या बहिणींनी त्यांच्याकडून संपत्तीचा वाटा घेऊ नये, इतकी साधी सोपी प्रद्धत वापरली तर कोर्टात जायची गरज भासणारच नाही.
 
कोर्टाची गरज तेव्हाच भासते, जेव्हा प्रत्येक व्यक्ती आपल्या बाजूने ताणत असतो. अति ताण पडला की, ती दोरी तुटते व वादास सुरुवात होते. ती तोडण्यापेक्षा समजुतीने घेऊन टिकवली तर कोर्टाची गरजच भासणार नाही.
 
कुठलीही गोष्ट ही समायोजनाने सुटते फक्त त्यासाठी आपल्या मनाची तयारी असायला हवी. या सर्व वादामुळे आपल्या पाल्याचं, मामाचं, मावशीचं, आत्याचं घर तुटलंय्‌. या संपत्तीच्या वादात या सर्व घरांचे दरवाजे बंद झाले आहेत. संपत्ती तर मिळतेय्‌ पण जिवाला जीव देणारी नाती हरवलीय्‌.
 
यावर आपण विचार करण्याची गरज आहे, की आपणास कशाला प्राथमिकता द्यायला हवी, संपत्तीला की नात्यांना?