शाळेच्या सुखद आठवणी!

    दिनांक :11-Jul-2019
सर्वेश फडणवीस
8668541181
 
शाळा प्रत्येकाच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे. व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली, तरी शाळा आणि त्याच्या आठवणी या कायम हृदयाच्या एका कुपित असतात. शाळेतील कुणी, कुठेही आणि कधीही भेटले, तरी त्याचा सुगंध कायम दरवळवत असतो. शाळेविषयी वाटणारी आत्मीयता प्रत्येकात लपलेली असते, यात शंकाच नाही आणि ही आत्मीयता चिरकाळ टिकणारी सदैव नित्यनूतन मनस्वी आनंद देणारी असते. 

 
 
शहरातील शाळा म्हणजे काही मजल्यांची विस्तीर्ण आणि मोठी इमारत असते. ग्रामीण भागात बर्‍यापैकी बैठीच, अगदी घराप्रमाणे शाळा असतात. काही ठिकाणी चारी बाजूंनी वर्ग व मध्यभागी भले मोठे प्रशस्त मैदान असतात आणि त्या प्रशस्त मैदानात राष्ट्रगीतापासून सुरुवात होऊन मग खेळायचे तास असायचे आणि जेव्हा खेळाचे सामने व्हायचे तेव्हा कब्बडी, मल्लखांब लंगडी, खो-खो, उंच उडी, गोळाफेक असे सामने होत होते. त्यात शाळेच्या मैदानाच्या चारी बाजूंना झाडे असायची आणि पर्यावरणाच्या बाई झाडांच्या संवर्धनासाठी कायम आग्रही असायच्या. मग राखी पौर्णिमेला झाडांना राखी बांधून रक्षाबंधन सारखा उपक्रम ही आनंदाने साजरा होताना शाळेत वेगळीच मजा होती.
 
शाळेत काही तास असायचे त्यात योगा, कवायत, डंबेल्स व लेझिम शिकवले जायचे. त्यात वाद्यांच्या सुरात कवायत व लेझिम हे प्रकार व्हायचे. पूर्वीच्या शालेय वातावरणात विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हायचा. ते नुसते आठवले तरी मन सुखावून जाते. परंतु आज शाळेत हवे तसे शारीरिक तास होत नाही. आजच्या शाळांचे वेळापत्रक ही वेगळेच आहे.
 
वदनि कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे।
जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह,
उदभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म।
 
ही प्रार्थना व्हायची आणि एकत्र एकमेकांसोबत डबे खाण्याची मजा काही औरच होती. ही एकत्र बसून डबे खायची मजा आयुष्यात नंतर कुठेही अनुभवता येत नाही. जे संस्कार शाळेत केले जायचे ते शेवटच्या श्वासापर्यंत न विसरता येण्यासारखे आहेत आणि ही शाळेची तसेच दिलेल्या संस्कारांची ताकद आहे. लहानपणी जे काही प्रार्थना व स्तोत्रे शाळेने शिकवले त्या प्रार्थनेची आजही आवर्जून आठवण येते आणि कधीही गुणगुणत असताना काही वेळ आठवणींच्या विश्वात अनेकजण रमत असतात. शाळेतील स्नेहसंमेलने असो वा इतर सांस्कृतिक कार्यक्रम, त्यातील मजा व आनंद काही औरच असते व आजही ते अनेक शाळांनी जपले आहे.
 
शाळेत असताना मुख्याध्यापकांचा एक वेगळाच धाक व शिस्त होती. विद्यार्थी त्यांना शाळेबाहेरही तेवढेच घाबरत होते. तसे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागत. जर मस्ती केली व अभ्यास केला नाही तर शिक्षाही करत असत. ती त्यांची एक जबाबदारी होती. कारण याच त्यांच्या शिस्त व कर्तव्यातून उद्याचा एक चांगला नागरिक तयार होणार असतो हा विश्वास शिक्षकांना असतो. सगळेच शिक्षक तत्परतेने व जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांसाठी सारं करत असतात. सगळ्याच विद्यार्थ्यांना ही आपल्या शिक्षकांबद्दल मान-सन्मान होता व तो प्रत्येकाने आजही राखला आहे. आपल्या जवळपास राहणारे शिक्षक आजही भेटले व त्यांची आपली प्रत्यक्ष भेट जरी झाली तरी आनंदच होतो व त्यांना आपली प्रगती कळल्यावर ते आवर्जून म्हणतात, आम्ही शिकविले व तुम्ही शिकलात म्हणून तुम्ही एवढे मोठे झालात कारण त्यांनाही आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी व प्रेम असते व त्यांनाही त्याचा अभिमान असतो.
 
शालेय शिक्षण पूर्ण होऊन 10 वर्षे व अधिक उलटली. पण शाळेतल्या आठवणी तशाच आहेत. 15 ऑगस्ट व 26 जानेवरी यासारख्या राष्ट्रीय सणांना शाळेचे रूप वेगळेच असायचे. शाळा आणि शाळेतील शिक्षक हे रसायन कायमचं वेगळे असतात. आज या आभासी जगात शाळेतील अनेक मित्र, मैत्रिणी, शिक्षक जेव्हा भेटतात तो आनंद निराळाच जो प्रत्येक जण बर्‍यापैकी अनुभवत असतो. आधी भेट होते पुढे नंबर एकमेकांना दिल्या जातात आणि भेटीचे रुपांतर पुन्हा गाढ मैत्रीत होऊन शाळेच्या आठवणीत रमून जातात. ही आठवणींची साठवण कायम असते. शाळा आणि शाळेच्या आठवणी या प्रत्येकाला हव्याहव्याशा असतात. आता पुन्हा नव्यानं नवे सत्र व शाळा सुरू झालेल्या आहेत. जेव्हा लहान मुले तयार होऊन बसची वाट बघत उभे असतात काही सायकलवर जाणारी मुलं बघितली की आपल्याला आपुसक आपले शाळेचे दिवस आठवतात आणि पुन्हा त्या आठवणींच्या गावी काही वेळ स्थिरावत पुढच्या कामाला लागतो. कारण शाळेचे ते दिवस परत येणार नाही हे माहिती असून सुध्दा ते कायम आठवणीच्या साठवणीत असतात आणि साठवणीत राहूनच जीवनाचा आनंद लुटला तर आयुष्य सकारात्मक आणि सुदृढ राहतं. चला तर मग पुन्हा शाळेचा शाळेच्या सुखद आठवणी जपूया.