CWC2019 ; तुमच्याप्रमाणेच आम्हीही निराश आहोत - कोहली

    दिनांक :11-Jul-2019
नवी दिल्ली, 
विश्वचषक कि‘केट स्पर्धेतील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून मात खावी लागल्यानंतर भारतीय कि‘केट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. आमच्या संघाने स्पर्धेत सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावण्याचा प्रयत्न केला, असेही त्याने आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे. भारताला बुधवारी ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानावर 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. 

 
 
सामन्यानंतर केलेल्या ट्विटमध्ये कोहली म्हणतो की, सर्वप्रथम मी त्या चाहत्यांचे आभार व्यक्त करतो ज्यांनी आम्हाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानावर आणि मैदानाबाहेर गर्दी केली होती. तुम्ही आमच्यासाठी ही स्पर्धा एक संस्मरणीय ठरविली आहे, तुम्ही दिलेल्या प्रेमाचा आम्ही अनुभव घेतला आहे. आम्ही सर्वजण निराश आहोत आणि आम्हाला तसे वाटत आहे, जसे तुम्हाला वाटत आहे. आम्ही आपले शंभर टक्के योगदान दिले आहे. जयहिंद.
 
 
 
वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यानेही ट्विटरवरून चाहत्यांचे आभार मानले आहे. आम्ही आमच्याकडून पूर्ण प्रयत्न केला. मी संघातील सर्व सदस्य, आमचे प्रशिक्षक, सहयोगी कर्मचारी, कुटुंबातील सदस्य आणि आम्हाला समर्थन देणार्‍या आपल्यासार‘या सर्व चाहत्यांना धन्यवाद देऊ इच्छितो, असे बुमराहने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
 
विश्वचषक स्पर्धा जिंकणे, हे आमचे सर्वात मोठे लक्ष्य होते. मात्र, आम्ही ते साध्य करू शकलो नाही. भावनांचे वर्णन करता येत नाही. मात्र, ज्यांनी शेवटपर्यंत आमची पाठराखण केली त्या चाहत्यांना मी मनापासून धन्यवाद देऊ इच्छितो. जयिंहद... असे संदेश फिरकीपटू युजवेंद्र चहल यांनी ट्विटरवर टाकला आहे.
 
खेळाने मला पडल्यानंतर पुन्हा उठून उभे राहण्याची आणि कधीही हार न मानण्याची शिकवण दिली आहे. चाहत्यांना धन्यवाद देतो, जे माझे प्रेरणास्रोत आहेत. आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद. प्रेरणा देत राहा, मी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्याचा प्रयत्न करीत राहील. आपल्या सर्वांना प्रेमाच्या शुभेच्छा... असे ट्विट दमदार फलंदाजी करणार्‍या रवींद्र जडेजाने केले आहे.
 
दरम्यान, उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर विश्वचषक स्पर्धेतून बाहेेर पडलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या एकूणच कामगिरीचे बीसीसीआयचे कार्यकारी अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी कौतुक केले आहे. उपांत्य सामना थोडा कठीण होता. आमच्या खेळाडूंनी परिश्रम घेतले. कोणताही सामना गमाविण्याची कोणाचीच इच्छा नव्हती. सर्वच खेळाडूंनी आपल्यापरीने सर्वोतोपरी प्रयत्न केले. मात्र, तो दिवस आमचा नव्हताच, असे खन्ना यांनी एका निवेदनाद्वारे म्हटले आहे.
 
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने साखळी फेरीत उत्कृष्ट कामगिरी बजावली. मला विश्वास आहे की आमचा संघ आणखी कठोर मेहनत करेल आणि भविष्यात आणखी यश संपादन करेल. न्यूझीलंड संघाचे अभिनंदन. मी त्यांना आपल्या शुभेच्छा देतो, असेही खन्ना यांनी निवेदनात म्हटले आहे.