बिकाऊ, देशद्रोही पत्रकारांनी बॅन करावंच

    दिनांक :11-Jul-2019
काही पत्रकार चांगले आहेत, परंतु काही पत्रकार बिकाऊ नी देशद्रोही आहेत असे सांगत कंगना रणौतने अशा पत्रकारांनी मला बॅन करावंच असे सांगत आव्हानाची भाषा व्यक्त केली आहे. कंगनाची बहीण रंगोली चंडेलने ट्विटरच्या माध्यमातून हा व्हिडीओ प्रसारीत केला आहे. ‘जजमेंटल’ सिनेमाच्या एका प्रेस कॉन्परन्स दरम्यान कंगनाची एका पत्रकाराशी बाचाबाची झाली होती. त्यानंतर काही प्रसारमाध्यमांनी कंगनाला बॅन करण्याचा इशारा दिला होता.
 
 
काही मोजके पत्रकार आहेत, ते बिकाऊ आहेत व देशद्रोही आहेत असे सांगत आपण त्यांना किंमत देत नसल्याचे कंगना म्हणाली आहे. मी काही समाजसेवेची कामे केली होती त्यांचीही या पत्रकाराने खिल्ली उडवली होती असा आरोप करत लिबरल सेक्युलर म्हणवणारे हे पत्रकार ढोंगी असल्याचे कंगना म्हणाली आहे. अशा पत्रकारांना आपण किंमत देत नसून त्यांनी खुशाल माझ्यावर बंदी घालावी असे आव्हानच तिने दिले आहे. कंगनाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
 
 
 
अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री कंगना राणावत यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटातील गाणे रिलिज करण्याच्या निमित्ताने पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या वेळी एका पत्रकाराने प्रश्न विचारला असता, उत्तर देण्याऐवजी त्याने ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झाँसी’ या चित्रपटाची जाणूनबुजून बदनामी केल्याचा आरोप कंगनाने केला. या वेळी या दोघांमध्ये सुरू झालेला वाद इतका वाढला की, अखेर एकता कपूर आणि राजकुमार राव यांनी उपस्थितांची माफी मागत हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला. जो पर्यंत कंगना या प्रकरणी पत्रकारांची माफी मागत नाही तोपर्यंत सगळ्या माध्यमांवरून बहिष्कार टाकण्यात आला असल्याचे ‘एण्टरटेन्मेंट जर्नालिस्ट्स गिल्ड ऑफ इंडिया’ या संघटनेने जाहीर केले होते.
 
 
 
‘जजमेंटल है क्या’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत अभिनेत्री कंगना राणावत हिने एका पत्रकारावर केलेल्या आरोपातून झालेल्या वादविवादाचा प्रकार हा दुर्दैवी होता, या प्रकाराबद्दल आपल्याला खंत वाटते, असे सांगत निर्माती एकता कपूर हिने एका निवेदनाद्वारे माफी मागितली आहे. एकता कपूरने माफीचे निवेदन दिल्यानंतर ते स्वीकारल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे, मात्र कंगनाने अजूनही माफी मागितली नसल्याने तिच्यावरचा बहिष्कार कायम ठेवण्यात येणार असल्याचे संघटनेकडून सांगण्यात आले.