उघड्या गटारांसाठी मुंबईकरही जबाबदार: महापौर

    दिनांक :11-Jul-2019
मुंबई,
गोरेगाव येथील गोरेगाव-मुलुंड लिंक रोडवरील इटालियन कंपनीजवळील आंबेडकर चौकातील एका नाल्यात दिव्यांश धानसी हा दीड वर्षाचा मुलगा पडला. बुधवारी रात्री १०.२४ वाजता ही घटना घडली. घरातून खेळता खेळता दिव्यांश रस्त्यावर आला. रस्त्याच्याकडेला असलेल्या नाल्याजवळून माघारी जाण्यासाठी वळत असताना पाय घसरून तो नाल्याच्या मॅनहोलमध्ये पडला. नाल्यातील पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे तो वाहून गेला असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेजमधून स्पष्ट झाले आहे. ही घटना घडली त्यावेळी त्याच्या आसपास कोणीच नसल्याचेही सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. अद्यापही या मुलाचा शोध लागलेला नाही. यानंतर आज महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घटनास्थळी भेट दिली त्यावेळी त्यांना स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. दरम्यान, महापौरांनी या घटनेसाठी मुंबईकरांनाच जबाबदर ठरवले असून, मुंबईकरच गटारांची झाकणं उघडी ठेवतात असं ते म्हणाले.
 
 
अनेक ठिकाणी स्थानिक लोक गटारांवरील झाकणं काढत असल्याचे सांगत महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी गोरेगावच्या घटनेचे खापर मुंबईकरांच्याच माथी फोडले. दरम्यान याप्रकरणी त्यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. गटार स्थानकांनी तोडल होते की प्रशासनानेच झाकण बसवले नव्हते हे पाहणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.