'ही' तरुणी ठरणार बेस्टची पहिली महिला चालक

    दिनांक :11-Jul-2019

 
 
मुंबई : गजबजलेल्या मुंबईत शिताफीने वाटा काढत मुंबईकरांना वाहतूक सेवा पुरविणाऱ्या बेस्ट बसचे स्टेअरिंग आता लवकरच महिलांचाही हातात येणार आहे. प्रतीक्षा दास ही पहिली महिला बेस्ट चालक होणार असून नुकतेच तिने यासंदर्भातील प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली आहे. प्रतिक्षाने नुकतीच मालाडमधील ठाकूर महाविद्यालामधून मॅकेनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतली असून लवकरच ती बेस्टच्या सेवेत रुजू होणार आहे. बेस्ट चालक होण्याबद्दल विचारले असता ‘मला अवजड वाहनांचे प्रचंड वेड आहे. बेस्टची बस मला चालवता यावी अशी मागील सहा वर्षांपासूनची इच्छा होती. खरं तर बेस्टमध्ये प्रशिक्षण सुरु करण्याच्या आधीपासूनच मला अवजड वहाने, बाईक्स आणि कारचे प्रचंड वेड आहे. आठवीमध्ये शिकत असतानाच मामाच्या गावी मी बाईक चालवायला शिकले. त्यावेळी मी अवघ्या दोन दिवसांमध्ये बाईक चालवायला शिकले याचं मामालाही आश्चर्य वाटले होते. आता मी बाईक्स, मोठ्या चारचाकी गाड्या आणि अगदी ट्रकही सहज चालवू शकते. आणि मला त्याचा चालवताना खूप छान वाटते,’ असं प्रतीक्षा सांगते. गोरेगाव बस डेपोमध्ये प्रतीक्षा सध्या प्रशिक्षण घेत आहे.