जैशच्या तीन अतिरेक्यांना अटक

    दिनांक :11-Jul-2019
श्रीनगर, 
अनंतनाग जिल्ह्यात 12 जून रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी आज गुरुवारी जैश-ए-मोहम्मदच्या तीन अतिरेक्यांना अटक केली. या हल्ल्यात सीआरपीएफचे पाच जवान आणि एक पोलिस अधिकारी शहीद झाला होता. 

 
 
दक्षिण काश्मिरात पोलिसांनी ही कारवाई केली. अतिशय वर्दळीच्या के. पी. रोड भागात जैशच्या अतिरेक्यांनी केलेल्या या हल्ल्याच्या कटाची सविस्तर माहिती त्यांनी दिली, असे वरिष्ठ पोलिस अधिकार्‍याने सांगितले.
 
जैशचा स्थानिक कमांडर फय्याज पुंझू याने पाकिस्तानी अतिरेक्याला 8 जून येथे आणले होते आणि आमच्यापैकी एकाच्या घरात ठेवले होते. या हल्ल्याचा कट त्यानेच तयार केला होता आणि त्यासाठी त्याने हल्ल्याच्या संभाव्य ठिकाणांची टेहळणी केली होती, अशी कबुलीही या तिघांनी दिली असल्याचे अधिकारी म्हणाला.
 
दक्षिण काश्मिरातील एका घरात हे अतिरेकी लपले असल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्या घरात कोणकोण आहेत आणि त्यांच्याजवळ कुठली शस्त्रे आहेत, याविषयी माहिती नसल्याने, आम्ही अतिशय सावध पावले उचलली. आधी काही अधिकार्‍यांना सामान्य वेशात पाठविले आणि त्यांच्याकडून हिरवा कंदिल मिळाल्यानंतर कारवाई करण्यात आली, असे अधिकार्‍याने सांगितले.