मध्यप्रदेश, राजस्थानात काँग्रेस झाली सावध

    दिनांक :12-Jul-2019
- आमदार एकत्र ठेवण्याच्या हालचाली सुरू
नवी दिल्ली,
कर्नाटकनंतर गोव्यातही अचानकच आलेल्या राजकीय भूकंपानंतर, काँग्रेस पक्ष सावध झाला आहे. अपक्ष व इतर पक्षांच्या पाठिंब्याने सत्तेत असलेल्या मध्यप्रदेश आणि राजस्थानात आपले आमदार फुटणार नाही, याची काळजी घेण्यासाठी काँग्रेसने हालचाली सुरू केल्या आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये अतिशय कमी फरकाच्या बहुमताने कॉंग्रेस सत्तेत आली आहे. या राज्यांमध्ये सरकारचे अस्तित्व काही अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांनी बाहेरून दिलेल्या पािंठब्यावर अवलंबून आहे.
 
 
 
कर्नाटक आणि गोव्यात आमदारांनी केलेल्या बंडखोरीची पुनरावृत्ती मध्यप्रदेश आणि राजस्थानातही होऊ शकते, ही भीती काँग्रेसला सतावत आहे. यातूनच मुख्यमंत्री कमलनाथ, वरिष्ठ नेते दिग्विजयिंसह आणि इतर नेते सावध झाले असून, फक्त विरोधकांच्याच नव्हे, तर आपल्या आमदारांच्या हालचालींवरही त्यांचे बारिक लक्ष आहे, असे सूत्रांनी सांगितले. मध्यप्रदेशातील कमलनाथ सरकार सपा, बसपा आणि अपक्ष आमदारांच्या पािंठब्यावर टिकून आहे, तर राजस्थानात अशोक गहलोत आणि सचिन पायलट असे दोन गट पडले आहेत. येथे अपक्षांनी कमलनाथच मुख्यमंत्री असावे, या अटीवर पाठिंबा दिला आहे.
 
मध्यप्रदेशचे समीकरण
2018 मधील विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 114, तर भाजपला 109 जागांवर विजय मिळाला होता. 230 सदस्य असलेल्या मध्यप्रदेशात बहुमताचा आकडा 116 आहे. अशात कॉंग्रेसने सपाचा 1, बसपाचे 2 आणि 4 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे.
 
राजस्थानातील परिस्थिती
राजस्थान विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला 100 आणि भाजपाला 73 जागा मिळाल्या. बसपाला 6 जागा मिळाल्या. 200 सदस्य असलेल्या विधानसभेत सरकार स्थापन करण्यासाठी बहुमताचा आकडा 101 आहे. येथे कॉंग्रेसने 12 अपक्ष आमदारांच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आहे.