नागरिकत्व द्या, अन्यथा पाकिस्तानला परत पाठवा

    दिनांक :12-Jul-2019
- माजी अतिरेक्यांच्या बायकांची मागणी
श्रीनगर,
आम्ही आणखी किती दिवस प्रतीक्षा करायची? एकतर आम्हाला भारतीय नागरिकत्व प्रदान करा किंवा पाकिस्तानला परत पाठवा, अशी मागणी काश्मिरी अतिरेक्यांच्या पाकिस्तानी बायकांनी आज शुक्रवारी केंद्र आणि जम्मू-काश्मीर सरकारकडे केली आहे.
 
 
 
सरकारच्या पुनर्वसन मोहिमेला प्रतिसाद देऊन सीमेपलीकडून आलेल्या आणि दहशतवादाचा मार्ग सोडणार्‍या या अतिरेक्यांच्या बायकांनी आज पत्रकारांपुढे आपले मत व्यक्त केले. भारतीय नागरिकत्व मिळेल, यासाठी आम्ही 350 महिला प्रतीक्षा करीत आहोत. येथील तरुणांसोबतच आमचा विवाह झालेला आहे आणि ज्या देशातील तरुणाशी महिलेचा विवाह होतो, त्याच देशाचे नागरिकत्व तिला मिळत असते. त्यामुळे आम्हालाही भारताचे नागरिकत्व देण्यात यावे, अशी विनंती असल्याचे पाकिस्तानच्या अबोटाबाद येथील तैबा असे नाव असलेल्या एका महिलेने सांगितले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर आणि जम्मू-काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक, तसेच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. सोबतच, संयुक्त राष्ट्राच्या मानवी हक्क आयोगानेही आमच्या समस्या विचारात घ्यावा, असे आवाहन अन्य महिलांनी केले. पाकिस्तान आणि गुलाम काश्मिरात आमचे नातेवाईक राहतात. त्यांची भेट घेण्याची आमची इच्छा आहे, पण स्थानिक सरकार आम्हाला प्रवासी व्हिसा द्यायला तयार नाही, असा या महिलांचा आरोप आहे.