अमेरिकेला सर्वाधिक धोका चीनचा

    दिनांक :12-Jul-2019
- वरिष्ठ लष्करी अधिकार्‍याची माहिती
वॉशिंग्टन,
चीनमुळे अमेरिकेच्या सुरक्षेला भविष्यात मोठा धोका निर्माण होणार आहे, अशी माहिती अमेरिकन लष्करातील वरिष्ठ अधिकार्‍याने सिनेट समितीपुढे बोलताना दिली. आगामी 50 ते 100 वर्षेपर्यंत अमेरिकेपुढे एकमेव धोका हा चीनचाच आहे. 2119 मध्ये जेव्हा इतिहासकार 2019 मध्ये डोकावून पाहतील आणि इतिहासाची पुस्तके चाळतील, तेव्हा त्यांना अमेरिका आणि चीनमधील संबंधाचीच माहिती मिळेल, असे जनरल मार्क मिले यांनी समितीतील एक सदस्य डेव्हीड यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.
 
 
 
चीनकडून व्यापाराचा वापर स्वत:चे राष्ट्रीय हित जोपासण्यासाठीच केला जात आहे आणि वन बेल्ट वन रोड हा प्रकल्प याच धोरणाचा एक भाग आहे, या डेव्हीड यांच्या मताशी मिले यांनी सहमती दर्शवली. अमेरिकेला पाण्यात पाहणार्‍या देशांसोबत व्यापार संबंध वाढविण्यामागील चीनचा नेमका उद्देश काय आहे, यावर हा देश काहीच बोलणार नाही. 2025 नंतर बरेच चित्र बदललेले असेल, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.