गोव्याच्या धड्याचा बोध!

    दिनांक :12-Jul-2019
कॉंग्रेस पक्षाला झालेय्‌ तरी काय कळायला मार्ग नाही. एखाद्या लकवा झालेल्या माणसागत, शंभरी ओलांडलेल्या, देशातील सर्वात जुन्या पक्षाची परिस्थिती झाली आहे. एक काळ असा होता की कॉंग्रेस पक्षाची उमेदवारी मिळविणे दुरापास्त होते. पण गेले ते दिवस... तो इतिहास झाला... कॉंग्रेसची प्रचंड पीछेहाट झाली असून, आज देशातील सर्व राज्यांमध्ये जो-तो भाजपाकडे ओढला जातोय्‌ आणि या पक्षाचे सदस्यत्व घेताना त्या व्यक्तीला अभिमान झाल्याचे दिसून येत आहे. अगदी काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि गुजरातपासून पश्चिम बंगालपर्यंत सार्‍या देशातील नेतेमंडळी आणि विभिन्न क्षेत्रात काम करणारे लोक भाजपात प्रवेश करताना दिसत आहेत. विद्यमान आमदार, खासदारच नव्हे, तर जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, वेगवेगळ्या विषय समित्यांचे सभापती आणि नगरसेवक हिंदुत्वाचा, राष्ट्रीयत्वाचा, भारतीयत्वाचा, वंदे मातरम्‌चा, जय श्रीरामचा नारा देण्यासाठी आतुर झालेले दिसत आहेत. प्रत्येकालाच राष्ट्रीय धोरणांचा अंगीकार करणारी भाजपा ही ‘पार्टी विथ डिफरन्स’चा अनुभव येत आहे. यच्चयावत सार्‍या राजकीय पक्षातील नेते, भाजपाची धोरणे पटल्याने आणि या पक्षातील नेत्यांवर विश्वास वाढल्याने या पक्षात जात-पात, धर्म-प्रांत याचा साधा विचारही न करता आनंदाने प्रवेश घेते होत आहेत.
 
काही दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपात प्रवेश घेण्याच्या नाट्याचा आरंभ झाला आणि त्यात राज्यातील काही आमदारांसह पंचायत समित्या, जिल्हा परिषदांचे अनेक सदस्य तृणमूलचा त्याग करून भाजपासवासी झाल्याने त्या स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रथमच भाजपाचे कमळ फुलले. त्या वेळी आमदारांच्या प्रवेशाचा हा पहिला टप्पा असल्याचे पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी सांगितले आणि अशा सात टप्प्यांत तृममूलचे अनेक आमदार भाजपात येतील, असे भाकीत करून, त्या वेळी राज्यातील ममतांचे सरकार अल्पमतात येईल, असा दावाही केला. यानंतर तेलगू देसम्‌ पार्टीचे चार खासदार, त्यांचे सर्वेसर्वा विदेशात भ्रमंतीचा आनंद घेत असताना भाजपावासी झाले आणि त्यांनी पक्षाची सदस्यता ग्रहण करून, भाजपाची राज्यसभेतील शक्ती वाढविली. यावेळी पक्षावर पैशाचे आमिष दाखविले गेल्याचा आरोप झाला. पण, देशाच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंतची इतर पक्षातील नेतेमंडळी भाजपात येत असताना, त्यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप करणे म्हणजे त्यांच्या द्रष्टेपणाबद्दलच शंका घेण्यासारखेच आहे.
 
 
पैशाच्या आमिषाचा आरोप खरा असेल, तर मग गोव्यात भाजपाची सत्ता असताना आणि पक्षाला बहुमतही प्राप्त असताना तेथील कॉंग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश करण्याची कोणती कारणे देणार? मुख्य म्हणजे गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्या नेतृत्वात या सार्‍यांनी पक्षत्याग करून कमळ हाती घेतले. गोव्यातील कॉंग्रेसचे 10 आमदार आमच्या संपर्कात असल्याची घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी जूनमध्येच केली होती. गेले काही दिवस त्यांच्या वाटाघाटी सुरू होत्या आणि काल त्याला यश येऊन हे सारे आमदार भाजपात डेरेदाखल झाले. आता बाबू कवळेकर यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे भाजपावर अल्पसंख्यकविरोधी असल्याचा आरोप करणार्‍यांनी ही बाब ध्यानात घेतली पाहिजे की, गोव्यात या पक्षप्रवेशानंतर ख्रिस्ती आमदारांची संख्या 14 झाली आहे. हे झाले ख्रिस्ती लोकप्रतिनिधींबाबतचे चित्र. अशी घटना दोन दिवसांपूर्वी घडली. दिल्लीत खासदार पूनम महाजन यांच्या नेतृत्वात काश्मीर खोर्‍यातील अनेक मुस्लिम युवकांनी आणि व्यावसायिकांनी भाजपाचे दुपट्‌टेे घालून या पक्षाचे सदस्यत्व ग्रहण केले. ही घटना मुस्लिमांमध्येही भाजपाचे आकर्षण वाढत आहे, हेच स्पष्ट करणारी आहे.
 
आज देशातील 16 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता असून, कॉंग्रेसशासित कर्नाटक, राजस्थान आणि मध्यप्रदेशमध्ये अस्थिरतेचे वातावरण आहे. लोकसभा निवडणुकीत छत्तीसगढसह या तीन राज्यांमध्ये भाजपाने जो विजय नोंदविला, त्यामुळे कॉंग्रेसच्या पायाखालील वाळू सरकू लागली. मध्यप्रदेश, राजस्थानात कॉंग्रेसला काठावरील बहुमत असल्याने ती केव्हाही भाजपाच्या दिशेने झुकू शकतात, अशी भीती दस्तुरखुद्द या पक्षातील नेत्यांनाच वाटू लागली आहे. तसे आरोपही केले जाऊ लागले आहेत. भाजपाचे नेते राजस्थान, मध्यप्रदेश आणि कर्नाटकची सरकारे पाडण्याच्या मागे लागली असून, त्यासाठी त्यांनी घोडेबाजार मांडला असल्याचेही आरोप कॉंग्रेस करू लागली आहे. आपले अपयश, कॉंग्रेस अध्यक्षांची निष्क्रियता, दिशाहिनता, नाकर्तेपणा अशा कितीतरी कमतरता लपविण्यासाठी असे आरोप लावणे कॉंग्रेसला सोयीचे वाटत आहे.
 
कर्नाटकातील परिस्थितीचा तर जनतेला अंदाज आहेच. 13 महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेले येथील सरकार अल्पमतात आल्याने कुठल्याही क्षणी कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुळात या राज्यात 224 सदस्यांच्या विधानसभेत बहुमतासाठी 113 जागांची गरज होती. भाजपाकडे 107 सदस्य होते. पण, छोट्या पक्षांचा पािंठबा न मिळाल्याने कुमारस्वामींनी (37 आमदार) कॉंग्रेसच्या पािंठब्याने (78 आमदार) तेथे सरकार स्थापन केले. पण, वर्षभरातच दोन्ही पक्ष एकमेकांना कंटाळले. घटस्फोट घेणे शहाणपणाचे ठरणार असले, तरी सत्तेची खुर्ची सोडण्यास ही मंडळी तयार नाहीत. यात राज्यातील जनता भरडली जात आहे. असाच प्रकार मध्यप्रदेशातही अनुभवायला येत आहे. लोकसभा निवडणुकीनंतर या राज्यात पक्षाची स्थिती कमकुवत झाली आहे. राज्यात फक्त छिंदवाडा हा कमलनाथ यांचा मतदारसंघ सोडला, तर कॉंग्रेसला एकही जागा मिळाली नाही. राज्यातील दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे (गुना), दिग्विजय सिंह (भोपाळ), अजय सिंह (सिधी) आणि अरुण यादव (खंडवा) यांचा लोकसभेत पराभव झाल्याने कमलनाथ यांना पर्यायच उरला नाही. सध्या त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपद आणि मुख्यमंत्रिपद दोन्ही जबाबदार्‍या आहेत. पण, या पदांना एकाच वेळी न्याय देणे शक्य नाही. मध्यंतरी पक्षातील 10 आमदार फुटून जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण आमदारांच्या मागण्या वाढल्या होत्या. त्यावर सध्यातरी कमलनाथ यांनी विजय मिळविला आहे. पण, भविष्यात कोण बंडखोरी करेल आणि भाजपाशी हातमिळवणी करून हे सरकार पाडेल, हे सांगता येणे शक्य नाही. माजी मुख्यमंत्री शिवराजिंसह चव्हाण यांच्या मते, मध्यप्रदेश सरकार आपल्याच नाकर्तेपणामुळे कोसळणार आहे. जशी परिस्थिती मध्यप्रदेशात आहे तसेच काठावरचे बहुमत राजस्थानातही कॉंग्रेसला मिळाले आहे. बहुमतासाठी 110 जागांची गरज असताना येथे कॉंग्रेसने 99 जागा जिंकल्या आहेत. बसपाच्या सहा आमदारांनी पािंठबा दिल्याने हे सरकार तगले आहे. भाजपाचे येथे 73 सदस्य निवडून आले आहेत. राज्यात तरुण मुख्यमंत्री की अनुभवी, या स्पर्धेत अशोक गहलोत यांनी बाजी मारली. त्यामुळे राज्यात कॉंग्रेसमध्ये पक्षांतर्गत धुसफूस सुरू आहे. त्याचा कधीही स्फोट होऊ शकतो. आज देशातील 16 राज्यांमध्ये भाजपाची सरकारे असून पक्षाने 51 टक्क्यांहून अधिक मते मिळविलेली आहेत. कॉंग्रेसने आपला पाय मजबूत केला नाही, देशाला नवनेतृत्व दिले नाही, तर जी पडझड गोवा, कर्नाटक, आंध्र, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तेलंगणा, गुजरातेत झाली, त्याचे पडसाद इतर राज्यांतही बघायला मिळणार नाहीत, असे कुणीच छातीठोेकपणे सांगू शकणार नाही. गोव्याच्या धड्यातून कॉंग्रेसने काय तो बोध घ्यावा, एवढेच सांगवेसे वाटते.