जुन्यातून घराची सजावट

    दिनांक :12-Jul-2019
अवंतिका तामस्कर
 
हल्ली एखाद्याच्या घरात जिन्स पॅण्ट नाही असे क्वचितच होते. लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण जिन्सचा वापर करीत असतो. आता मुलीही यामध्ये आघाडीवर आहेत. आपण जिन्स वापरतो खरा, परंतु काही कालावधीनंतर त्या जुन्या झाल्यावर त्याचं करायचं, काय असा प्रश्न पडतो. अहो मग, याचा फार विचार करू नका, या जिन्सचा वापर तुम्हाला तुमच्या घर सजावटीसाठी करता येईल आणि तो दिसायलाही उत्तम असेल. 

 
 
काही वर्षांपूर्वी जुने कपडे भोवारी देण्याची प्रथा होती. त्या कपड्यांच्या बदल्यात आपल्याला नवीन भांडी मिळायची. आता हा भोवारी पण क्वचितच दिसतो आणि नवीन भांडी तर अशीच येता-जाता लोकं घेत असतात. त्यामुळे जुन्या कपड्यांचा प्रश्न ऐरणीवर येतो आहे. बरं या जुन्या कपड्यांमध्ये जीन्सचे प्रमाण जास्त असल्याचे दिसून येते. कारण आजकालच्या तरुणांबरोबरच लहान मुलं आणि ज्येष्ठांनाही जीन्स्च कम्फर्टेबल वाटते. जिन्स ही वापरायला रफ अॅण्ड टफ असते आणि टिकतेही अधिक काळ. परंतु शेवटी एकच कापड आपण किती दिवस घालणार, त्यालाही मर्यादा असतातच की! काही ठराविक कालावधीनंतर नवीन कपडे येतात आणि जुन्यांना अडगळीची जागा मिळते. जिन्सच्या बाबतीत मात्र तुम्ही जरा हटके विचार करू शकता. याच जुन्या झालेल्या जिन्सचा वापर करून तुम्ही घराला एक वेगळा लूक देऊ शकता. चला तर मग पाहूया, जुन्या जिन्सचा वापर आपण कसा आणि कुठे करू शकतो. 
 
 
सोफा-सेट : कुठल्याही घरात गेल्यावर सर्वात प्रथम दृष्टीस पडतो तो लिव्हिंग रूममधला सोफा! याच दर्शनिय भागात असणार्‍या सोफ्याला तुमच्याकडे उपलब्ध असणार्‍या जिन्सच्या कापडाचे कव्हर शिवता येईल.
 
पडदे : हल्ली नवीन फ्लॅटमध्ये बहुतांशवेळा खिडक्या मोठ्या असतात, त्यामुळे त्यांना पडदे लावणे अनिवार्यच असते. मग हे पडदे जर जिन्सचे असतील तर किती भारी दिसेल ना त्याचे कापड, रंग वेगळा असला, तरी चालेल परंतु पडदा जिन्सचा आहे, म्हटल्यावर बघण्याचा दृष्टिकोन बदलेल.
 
गालिचा : प्रशस्त फ्लॅटच्या आजच्या संस्कृतीमध्ये लिव्हिंग रूमच्या सजावटीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्या रूममध्ये गालिचा पसरून एकप्रकारे अद्ययावत सजावट करण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करीत असतो. अशा वेळी जिन्सचा वापर करून हा गालीचा तयार करता येणे शक्य आहे.