वारी, वारी, जन्म-मरणाते वारी...

    दिनांक :12-Jul-2019
पूर्वा जोशी
 
तुळशीहार गळा कासे पीतांबर।
आवडे निरंतर हेचि ध्यान।।
असे म्हणत पंढरीच्या वाटेने जात विठ्ठल-रखुमाई म्हणजेच सारेकाही, हा भक्तिभाव अपरंपार जपत, केली जाते ती वारी. 
चंद्रभागेच्या वाळवंटापलीकडून उंच शिखरे, सपाट कौलारू छपरे, धर्मशाळा, झाडे, वस्त्या सर्वावर उठून दिसणारी विठ्ठल, रखुमाई व पुंडलिक मंदिरांची उंच शिखरे व कलश असलेले दगडी तटबंदीमागचे हे पंढरपूरचे अतिशय सुरेख मंदिर. या देवलयात लीन होण्यासाठी आषाढी एकादशीला आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून निवृत्तिनाथांची, सासवडहून सोपानदेवांची, पैठणहून एकनाथांची व उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. 

 
 
आषाढी एकादशी म्हटलं की समोर येतो तो पावसापाण्याची पर्वा न करत टाळ-मृदंगाच्या ठेक्यावर, आसमंतात दुमदुमणारा विठूनामाचा गजर आणि विठ्ठलचरणी लीन होणारा जनसागर. आषाढ महिन्यातील भागवत शुद्ध एकादशीला महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातून आषाढीच्या वारीला येणारा समुदाय या दिवशी विठ्ठलदर्शन करून आपल्या घराची वाट धरतो. आषाढ वारीनंतरची खरीप पिकांची काळजी आणि शेतीचे सगळे सोपस्कार यात विठ्ठलनाम मनात घेत आकंठ बुडून जातो आणि हेच शेतात येणारे धान्य आपण नंतर वर्षभर वापरतो. खरंच ही एकादशी आपल्याला आनंदाने एकत्र राहून प्रेम आणि भक्तीचा सुरेल उत्सव शिकवते. वारीत वेगवेगळ्या स्तरातून लोक एकत्र येतात आणि मिळून मिसळून राहून एकमेकांना अजीबात न दुखवता प्रेमाच्या गोड भावनेतून हा भक्तिउत्सव साजरा होतो. खरंतर मन एकाग्र करून चालणे हा आरोग्याचा मंत्र आहे.
 
वारीच्या निमित्ताने हा व्यायाम सात्त्विक भाव जागरूक ठेवून आरोग्य पूर्णतेकडे नेतो. प्रकृतिमान उत्तम ठेवण्यासाठी लागणार्‍या सगळ्या गोष्टी वारीत आपोआप घडतात. पचनाच्या तक्रारीची सुरवात पावसाळ्याच्या सुरवातीला सुरू होते आणि बरोबर त्याच काळात उपवास म्हणजे लंघन हे शरीरासाठी उत्तम व्रत एकादशीच्या दिवशी उपवास करून साध्य होते.  त्या दिवशी  पाणी व सुंठ-साखर घेतली जाते. त्यातली सुंठ म्हणजे तर अतिशय रामबाण आणि शरीरशुद्धी करणारे महा औषध. चालण्याचा भरपूर व्यायाम करून झाल्यावर ताजी रताळी, बटाटा यासारख्या कंद भाज्या; खजूर, फळे, वर्‍याचे तांदूळ, खिचडी अशा विविध, शक्ती देणार्‍या उपवासाच्या पदार्थांचे सेवनही एकदशीच्या दिवशी अगदी योग्यच. या दिवशी पूजन करून अहोरात्र तुपाचा दिवा म्हणजे अग्नीची पूजाच अर्थात पंचमहाभूताचा योग्य तो आदरच. 
 
विठ्ठल आणि वारकरी दोघांच्याही गळ्यातली तुळशीची माळ, कपाळावर गंध-टिळा-बुक्का, तोंडाने विठूनामाचा गजर आणि डोक्यावरील तुळस म्हणजे हिंदू धर्मात सांगितलेला अतिशय विज्ञानवादी आणि प्रगल्भ दृष्टिकोन. तुळशीसारख्या अति महत्त्वाच्या वनस्पतीला हे अढळ पद दिले गेले आहे. शरीरशुद्धी  करणारी पुदिन्याच्या कुळातील ही एक सुगंधी वनस्पती. सर्दी, कफ यामुळे येणारा ताप पळवून लावणारी, मलेरिया आणि न्यूमोनिया यासारख्या पावसाळ्यात हमखास डोकं वर काढणार्‍या दुखण्यावर गुणकारी. जखम भरायला मदत करणारी, मुरडा, आव, पोटदुखी बरी करणारी, रक्तामधील मेद कमी करून तंदुरुस्त ठेवणारी, शारीरिक तप करायला सहज मदत करणारी. अशा या तुळशीबद्दल संत तुकाराम म्हणतात-
आम्ही तेणे सुखी। 
म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी।
कंठी मिरवा तुळशी। 
व्रत करा एकादशी।।
नको असलेल्या जीवाणूंचा नाश करणारी, डासांना दूर ठेवणारी, रक्तशुद्धीसाठी मदत करणारी, बीरूपाने सगळ्या शरीरात थंडावा निर्माण करणारी, दातदुखी, श्वासात दुर्गंधी, दमा, फुफ्फुसांचे रोग, हृदयाचे विकार या सगळ्यावर गुणकारी अशी तुळस औषधनिर्मितीत मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. तिच्या पानांचा, मुळांचा, फुलांचा, फांद्यांचा, बिजाचा आणि खोडाचा उपयोग सगळ्या जगभरात केला जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून आणि विचारपूर्वक तुळशीचा रोपांची लागवड आता जागोजागी व्हायला हवी. तुळसवने तयार करणे, औषधी बागा निर्माण करणे हे सगळेच गावोगावी व्रत घेऊन करायला हवे आहे.
 उभे वृंदावन जयाचिये द्वारी।
होय श्रीहरी प्रसन्न त्या।।
तुळशीचे रोप लावील आणोनी।
तया चक्रपाणी न विसंबे।।
चला, पावसाळ्याच्या सुरुवातीला निसर्ग भरभरून देत असताना सुयोग्य वृक्षारोपण, तुळस रोपांचे संवर्धन, सर्व वारी मार्ग हिरवे राहतील अशी व्यवस्था, हिरवाई राखणारे आणि शुद्धी करणारे उपक्रम राबवून या  एकादशीला विठ्ठलचरणी लीन होऊ या. निसर्गाच्या वेगवेगळ्या घटकांचे भान ठेवत ही वारी चालताना विषमुक्त- पाणी, माती, हवा याकडे भक्तिभावाने लक्ष देऊन सामाजिक जबाबदारी पाळू या.