बंदुक घेऊन नाचणाऱ्या भाजपा आमदाराची पक्षातून हकालपट्टी

    दिनांक :12-Jul-2019
उत्तराखंडमधील वादग्रस्त भाजपा आमदार प्रणव सिंह चॅम्पिअन पुन्हा एकदा चर्चेत आले होते. हातात दारु आणि बंदूक घेऊन बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स केल्याचा त्यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर भाजपाने त्यांच्या या व्हिडीओची गंभीर दखल घेतली होती. भाजपाने त्यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. तसेच या व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या आधारवर त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
 
 
व्हायरल झालेल्या व्हिडीओत प्रणव सिंह हातात बंदूक घेऊन नाचताना दिसत होते. तसेच त्यांनी अश्लिल भाषेचाही वापर केल्याचे ऐकायला येत होते. मिळालेल्या माहितीनुसार, पायाचं ऑपरेशन यशस्वीपणे पार पडल्यानंतर प्रणव सिंह आपल्या घरी परतले होते. आपल्या समर्थकांसह याचाच आनंद ते साजरा करत होते. नाचताना प्रणव सिंह यांनी एक, दोन नाही तर चार बंदुका हातात घेतल्याचे पहायला मिळाले होते. यावेळी त्यांचे समर्थकही कौतुक करताना ऐकू आले होते. आपल्या समर्थकांना उत्तर देताना फक्त उत्तराखंड नाही, तर संपूर्ण भारतात असं कोणी करु शकत नाही असेदेखील प्रणव सिंह बोलताना ऐकायला येत होते. दरम्यान, त्यांचा हा व्हिडीओ त्यांच्याच अंगलट आला असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार आहे.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या आदेशावरून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. तसेच त्यांनी उत्तराखंडमधील भाजपाच्या अजय भट्ट यांना प्रणव सिंह यांच्याविरोधात कारवाई करण्याचे आदेश दिल्याचेही सूत्रांनी सांगितले. सध्या ते तीन महिन्यांसाठी पक्षातून निलंबित आहेत. दरम्यान, एका पत्रकाराने प्रणव सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. तसेच त्यांच्या या कृत्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या असल्याचेही ते म्हणाले. प्रणव सिंह हे आमदार आहेत. त्यामुळे त्यांनी जपून वक्तव्ये केली पाहिजे. परंतु त्यांनी अशा प्रकारचा एक व्हिडीओ तयार केला आणि नंतर तो व्हायरल झाला असल्याचेही ते म्हणाले.