देशात 1456 लोकांमागे एक डॉक्टर

    दिनांक :12-Jul-2019
-एकूण संख्या 19.47 लाख
नवी दिल्ली,
या वर्षीच्या मार्चअखेर देशात अॅलोपॅथी, आयुर्वेद, युनानी आणि होमिओपॅथी डॉक्टरांची एकूण संख्या 19 लाख 47 हजार इतकी आहे, अशी माहिती सरकारतर्फे आज शुक्रवारी लोकसभेत देण्यात आली. यातील 11 लाख 59 हजार 309 डॉक्टरांनी राज्य वैद्यक परिषद आणि भारतीय वैद्यक परिषदेकडे नोंदणी केली आहे. एकूण डॉक्टरांच्या तुलनेत ही संख्या 80 टक्के असून, याचाच अर्थ सुमारे 9.27 लाख डॉक्टर प्रत्यक्षपणे रुग्णसेवेत आहेत, असे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी लोकसभेत सांगितले.
 
 
 
यावेळी त्यांनी डॉक्टर आणि नागरिक यांच्या प्रमाणाचीही माहिती आहे. आपल्या देशाची लोकसंख्या 135 कोटी आहे. त्यानुसार, उपलब्ध डॉक्टरांचे प्रमाण 1456 नागरिकांसाठी एक डॉक्टर असे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या सिद्धांतानुसार, एक हजार लोकसंख्येमागे एक डॉक्टर असणे आवश्यक आहे. त्या तुलनेत भारतातील हे प्रमाण थोडे कमी आहे, असे ते म्हणाले. देशात आयुर्वेदिक, युनानी आणि होमियोपॅथी डॉक्टरांची संख्या 7.88 लाख आहे. यातील 80 टक्के म्हणजेच 6.30 लाख डॉक्टरच प्रत्यक्षात रुग्णसेवेकरिता उपलब्ध आहेत, असेही त्यांनी सांगितले.