लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळाप्रकरणी जामीन मंजूर

    दिनांक :12-Jul-2019
नवी दिल्ली,
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना झारखंड उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. चारा घोटाळ्यातील एका देवघर कोषागार प्रकरणात त्यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. लालूंसाठी ही दिलासा देणारी गोष्ट असली तरी त्यांना दुसऱ्या एका प्रकरणात मात्र जामीन न मिळाल्याने तुरुंगातच रहावे लागणार आहे.

 
 
चारा घोटाळ्यातील देवघर कोषागार प्रकरणी शिक्षेचा अर्धा काळ संपल्याचे कारण सांगत लालू प्रसाद यादव यांच्यावतीने झारखंड उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने यादव यांना ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला.
माध्यामांतील वृत्तांनुसार, या सुनावणीदरम्यान न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना आपला पासपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, चाईबासा-दुमका कोषागार प्रकरणी त्यांना अद्याप जामीन मिळू शकलेला नाही. त्यामुळे त्यांना तुरुंगातच रहावे लागणार आहे. दरम्यान, या जामीनामुळे लालू यादव यांच्यासाठी दिलासादायक गोष्ट ही आहे की, ते आपल्या वकीलांमार्फत देवघर कोषागार प्रकरणात मिळालेल्या जामीनाचा आधार घेत दुमका-चाईबासा कोषागार प्रकरणात जामीनासाठी याचिका दाखल करु शकतात.