गोवा मंत्रिमंडळात उद्या फेरबदल

    दिनांक :12-Jul-2019
- काँग्रेसचे तीन बंडखोर आमदार मंत्री होणार
पणजी,
काँग्रेसचे दहा आमदार भाजपात आल्यानंतर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उद्या शनिवारी आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार आणि फेरबदल करणार असून, यात काँग्रेसच्या तीन माजी आमदारांना मंत्रिपद देण्यात येणार आहे. गोवा विधानसभेतील विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या 15 पैकी 10 आमदारांनी बुधवारी रात्री भाजपात प्रवेश केला. गुरुवारी या सर्व आमदारांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. त्यानंतर आज सकाळी हे सर्व आमदार गोव्यात आले.
 
 
 
भाजपातील उच्चस्तरीय सूत्रांच्या मते, भाजपात आलेल्या दहापैकी तीन आमदारांना, तसेच विधानसभेचे उपाध्यक्ष मिशेल लोबो यांना मंत्रिमंडळात घेण्यात येणार आहे. तथापि, मंत्रिमंडळात सहभागी होत असलेल्या तीन आमदारांची नावे सूत्रांनी दिली नाही. लोबो यांनीही या वृत्ताची पुष्टी केली आहे. विशेष म्हणजे, काँग्रेसच्या दहा आमदारांना भाजपात आणण्यात लोबो यांची महत्त्वाची भूमिका होती.
 
मंत्रिमंडळ फेरबदलाच्या या प्रक्रियेत मुख्यमंत्री सावंत किमान चार मंत्र्यांना काढण्याची शक्यता आहे आणि यात घटक पक्षांच्या मंत्र्यांचाच समावेश राहणार आहे. गोवा फॉरवर्ड पार्टीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनाही मंत्रिपद गमवावे लागण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे मत आहे.