93 लाख रोख रक्कम, 400 ग्रॅम सोने...!

    दिनांक :12-Jul-2019
- पुरस्कार विजेत्या अधिकार्‍याच्या घरी सापडले घबाड
हैदराबाद,
तेलंगणामधील भ्रष्टाचार विरोधी पथकाने तहसीलदार व्ही. लावण्या यांच्या घरावर धाड टाकत केलेल्या कारवाईत 93.5 लाख रुपयांची रोख रक्कम आणि 400 ग्रॅम सोने जप्त केले आहे. व्ही. लावण्या यांच्या हैदराबाद येथील हयातनगर परिसरात असणार्‍या घरातून हे घबाड जप्त करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी ग्राम महसूल अधिकार्‍याला शेतकर्‍याकडून चार लाख रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आल्यानंतर आता ही कारवाई करण्यात आली आहे. जमिनीच्या कागदपत्रांमधील चूक दुरुस्त करण्यासाठी ग्राम महसूल अधिकार्‍याने ही लाच मागितली होती.
 

 
 
शेतकर्‍याला आठ लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. यापैकी पाच लाख रुपये तहसीलदारांसाठी तर तीन लाख रुपये ग्राम महसूल अधिकार्‍यासाठी होते. पैसे हातात येताच ग्राम महसूल अधिकार्‍याने तहसीलदारांशी संपर्क साधला. यामुळे भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्यांची चौकशी केली. व्ही. लावण्या यांनी स्वत:वरील आरोप फेटाळले होते. यानंतर भ्रष्टाचार विरोधी पथकाने त्यांच्या घरावर धाड टाकली. यादरम्यान एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये एक शेतकरी लावण्या यांच्या पाया पडत आपली विनंती मान्य करा, असे गार्‍हाणे मांडत होता. मिळालेल्या माहितीनुसार, या शेतकर्‍याचे नाव भास्कर असून ग्राम महसूल अधिकार्‍याने पासबुक देण्यासाठी त्याच्याकडे 30 हजारांची लाच मागितली होती.
 
भास्कर यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही चुका आढळल्या होत्या. चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांच्याकडे लाखो रुपयांची लाच मागण्यात आली होती. यानंतर त्यांनी भ्रष्टाचार विरोधी पथकाकडे तक्रार केली. विशेष म्हणजे लावण्या यांना दोन वर्षांपूर्वीच तेलंगणा सरकारकडून सर्वोत्तम तहसीदार हा पुरस्कार मिळाला होता. त्यांचे पती हैदराबाद महानगरपालिकेत अधीक्षक पदावर असल्याची माहिती आहे.