अद्यापही दिव्यांश बेपत्ताच ; ड्रेनेज लाइनची दहा किमीपर्यंत पाहणी

    दिनांक :12-Jul-2019
मुंबई,
 
बुधवारी रात्री गोरेगाव पूर्वेकडील दिंडोशी येथील आंबेडकर चौकामध्ये असलेल्या उघड्या गटारात दोन वर्षांचा दिव्यांश सिंग हा मुलगा पडला. घराबाहेर खेळता खेळता तो रस्त्यावर कधी आला हे कोणालाच कळले नाही. जवळच असलेल्या सीसीटीव्हीमध्ये तो गटारात पडल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी रात्रीपासून पोलिस, पालिका अधिकारी आणि अग्निशमन दलाचे जवान त्याचा शोध घेत असून गुरुवारी रात्रीपर्यंत त्याचा काहीच पत्ता लागला नव्हता. गटारापासून जवळच असलेल्या नाल्यांमध्ये तो वाहून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
 
बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी सकाळपर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांनी ड्रेनेज लाइनची दहा किलोमीटरपर्यंत पाहणी केली व जेसीबीच्या सहाय्याने ड्रेनेज लाइन फोडून मुलाचा शोध घेतला. मात्र तरीही गटारात पडलेल्या दिव्यांशचा ठावठिकाणा लागला नाही. गुरुवारी संध्याकाळी या परिसरात एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले. ड्रेनेज लाइनमध्ये कॅमेरे सोडून मुलाचा शोध घ्यावा, अशी मागणी रहिवाशांनी अग्निशमन दलाकडे केली आहे. दरम्यान, पालिकेच्या गैरकारभाराचा निषेध करण्यासाठी स्थानिकांनी गुरुवारी या परिसरात रास्ता रोको केल्यामुळे काही वेळ वाहतूककोंडी झाली होती.