प्रेयसीच्या पतीपासून बचावण्याच्या प्रयत्नात नवव्या मजल्यावरून प्रियकर पडला

    दिनांक :12-Jul-2019
मुंबई,
 
अनैतिक संबंधातून घातपाताचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडतात पण मुंबईत अनैतिक संबंध लपविण्याचा प्रयत्नात प्रियकराचा मृत्यू 
झाल्याची घटना समोर आली आहे.  
 प्रियकर रात्री प्रेयसीसोबत असताना अचानक तिच्या पतीला जाग आल्याचे लक्षात येताच, प्रियकराने नवव्या मजल्यावरील खिडकीतून आठव्या मजल्यावर येण्याचा प्रयत्न केला. मात्र, याच प्रयत्नात त्याचा तोल जाऊन खाली पडला  त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना आग्रीपाडा परिसरात घडली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करत अधिक तपास सुरु केला आहे.

 
नायर रोड परिसरातील इमारतीच्या नवव्या मजल्यावर  मृत तरुण कुटुंबियांसोबत राहायचा. तो बेरोजगार होता. त्याच मजल्यावर त्याची विवाहित मैत्रीण राहण्यास आहे. तिचे पती व्यावसायिक आहेत. दोघांमध्ये अनैतिक प्रेमसंबंध असल्याची माहिती समजते. ७ तारखेच्या रात्री पती घरात झोपला असताना, रोहन तिच्या खोलीत गेला. कोणीतरी घरात असल्याचे पतीला जाणवताच त्याला जाग आली. पती जागा झाल्याचे लक्षात येताच रोहनने नेहमीप्रमाणे तिच्या खिडकीतून आठव्या मजल्यावर जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पकडले जाण्याच्या भीतीने त्याचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. सुरक्षारक्षकाने त्याला जखमी अवस्थेत पाहताच, याबाबत घरच्यांना कळविले. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती मिळताच आग्रीपाडा पोलीस तेथे दाखल झाले आणि पंचनामा करून अपमृत्यूची नोंद केली आहे.