'या' कारणाने विवेकला चाहत्यांनी झापले

    दिनांक :13-Jul-2019
नवी दिल्ली,
अभिनेता विवेक ओबेरॉय सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहतो. यावेळी त्याने भारत विरूद्ध न्यूझीलंडचा जो विश्वचषकातला सामना रंगला होता त्याबाबत एक GIF ट्विट केले आहे. भारताचा या सामन्यात पराभव झाला, त्यामुळे भारताचे विश्वचषक विजयाचे स्वप्न भंगले. १० जुलै रोजी झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा १८ धावांनी पराभव केला होता. हा पराभव टीम इंडियाच्या आणि तमाम भारतीयांच्या मनाला बोचणी लावणारा ठरला. याचसंदर्भात अभिनेता विवेक ओबेरॉयने एक GIF शेअर केले आहे.
 
 
 
विवेक ओबेरॉयने शेअर केलेल्या GIF मध्ये एका व्यक्तीला रस्त्याने जात असताना एक महिला त्याच्याकडे येऊन त्याला मिठी मारण्याच्या तयारीत आहे असे वाटत असते. मात्र प्रत्यक्षात ती महिला या त्या व्यक्तीच्या मागे उभ्या असलेल्या माणसाकडे जाते आणि त्याला मिठी मारते. विवेक ओबेरॉयने हे GIF शेअर केले असून न्यूझीलंडविरोधातल्या सामन्यात भारतीय चाहत्यांची अवस्था नेमकी अशीच झाली असे म्हटले आहे. त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यानंतर नेटकऱ्यांनी त्याच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
 
 
 
काही नेटकऱ्यांनी याच GIF ला उत्तर देताना ऐश्वर्यानेही तुझ्यासोबत हेच केले असे म्हणून ती खळाळून हसतानाचे GIF शेअर केले आहे. तर काही नेटकऱ्यांनी विवेक ओबेरॉयला कुणीतरी काम द्या म्हणजे तो असले प्रकार बंद करेल असं म्हणत त्याची खिल्ली उडवली आहे.
 
याआधीही विवेक ओबेरॉयने एक्झिट पोल्सबाबत एक ट्विट केले होते. त्यात त्याने सलमान खान, ऐश्वर्या राय यांचाही फोटो वापरला होता. यावरून त्याच्यावर टीकेची झोड उठली होती. ते प्रकरण कुठे शांत होते ना होते तोच विवेकने पुन्हा एकदा टीम इंडियाच्या पराभवाबाबत एक GIF शेअर केले आहे.