साथ परमेश्वरी शक्तीची

    दिनांक :13-Jul-2019
माणसाच्या आयुष्यात अनेक अडचणी येतात. मनुष्याला बराच संघर्ष करावा लागतो. अपयशाचा सामना करावा लागतो. सततचं अपयश, संघर्ष यामुळे मनुष्य खचून जातो. हतबल होतो. सगळ्या आशा संपतात. स्वत:वरचा विश्वास डळमळीत होऊ लागतो. अशा वेळी मनुष्याला आधार असतो तो परमात्म्याचा. सगळं काही संपलंय असं वाटत असताना माणसाने परमेश्वरी शक्तीवर विश्वास ठेवला पाहिजे. परमेश्वरी शक्तीच्या मदतीने माणूस कोणत्याही क्षणी आश्चर्यजनक यश मिळवू शकतो. परमेश्वरी शक्तीवर विश्वास ठेवणारा मनुष्य कधीही निराश होत नाही. त्याचा आत्मविश्वास डळमळत नाही. विपरित परिस्थितीलाही स्वत:च्या बाजूने वळवण्याची क्षमता त्याच्यात निर्माण होते. परमेश्वरी शक्ती असीम, अनंत आहे. या शक्तीची साथ लाभली तर मनुष्य कोणतीही गोष्ट प्राप्त करू शकतो. परमेश्वराच्या साथीने माणूस अशक्य, अवघड वाटणारी गोष्टही अगदी सहजतेने साध्य करू शकतो.
माणसाच्या मनात देवाविषयीची श्रद्धा, भक्तीभाव जागृत झाला की कोणतीही गोष्ट किंवा परिस्थिती आपल्या विरोधात असल्याचं त्याला जाणवत नाही. देवावर अटळ विश्वास असणारे लोक प्रत्येक परिस्थितीत आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात.

 
 
विपरित परिस्थितीही आपल्याला अनुकूल असल्याचं ते मानतात आणि सकारात्मकतेने सामोरे जातात. या परिस्थितीतून बरंच काही शिकता येईल आणि आपण यातून बाहेर पडू यावर त्यांचा विश्वास असतो. म्हणूनच त्यांचा आत्मविश्वास कधीही डळमळत नाही. वाईट परिस्थितीचा सामना करताना ते डगमगत नाहीत. भगवान श्रीकृष्णाने गीतेत नमूद केलंय की, मला शरण येणारा भक्त भवसागरही तरून जातो. म्हणूनच वाईट परिस्थितीत चीडचीड करण्याऐवजी माणसाने धीर धरायला हवा. सत्य, धाडस आणि धैर्य यांच्या बळावर माणूस कोणतीही गोष्ट साध्य करू शकतो.
 
जो माणूस स्वताकदीवर विश्वास ठेवतो त्याला परमेश्वराची साथ मिळते. माणसाला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर देवाची गरज असते. त्यामुळे त्याने कायम देवाचं स्मरण करत राहावं. आयुष्यात सुख असो किंवा दु:ख... देवाला विसरू नये. यामुळे त्याच्या आयुष्यात कधीही दु:ख येणार नाही. आस्था, समर्पण आणि त्यागाची भावना आपल्याला परमेश्वराशी जोडू शकते.