चातुर्मास कहाण्यांमागच्या कहाण्या...

    दिनांक :13-Jul-2019
दरवर्षी आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. त्याचं सगळ्यांना अप्रूप असतं. बायकांना विशेषच. चातुर्मासात वेगवेगळे सण, पूजा, उपवास, उत्सव असतात. त्यानिमित्ताने खाणंपिणं, नटणं-मुरडणं, खेळणंसुद्धा मनसोक्त होते. या सगळ्यात आजकाल थोड्याशा दुर्लक्षित होतात त्या कहाण्या.
 
या चातुर्मासाच्या कहाण्या आजकाल पुस्तकांमधे संकलित आणि मुद्रितरूपात सहज वाचता येतात. या कहाण्यांची भाषा जुनी आहे. कहाण्या गद्य असल्या तरी त्यात एक लय आहे, ताल आहे. शब्दांना लडिवाळपण आहे. कुणी आणि केव्हा रचल्या या कहाण्या? या कहाण्यांना ‘पुराणांतर्गत’ असा संदर्भ दिलेला असला, तरी शेवटी पुराण म्हणजे संकलित केलेल्या प्राचीन लोककथाच. या कहाण्या शेकडो वर्षांपूर्वीचं, समाजाचं, कुटुंबाचं स्थैर्य आणि अस्थैर्य दाखवतात. बंदिस्तपणा आणि विसकळीतपणाही सांगतात. बावळटपणाकडे झुकलेला बाळबोधपणाही सांगतात. साध्या साध्या व्यक्तींनी साधेपणानीच दाखवलेला खणखणीत खंबीरपणाही सांगतात. कल्पकता आणि दूरदृष्टीही दाखवतात. अनेक कहाण्यांमधे खूप सुंदर, सशक्त, सामाजिक संदर्भ असतात. सूचक संकेत असतात. या कहाण्या वाचताना, ऐकताना, सांगताना उगीच तर्क आणि विचक्षणा करायची नसते. त्याचं मर्म जाणून घ्यायचं असतं. भारतीय स्त्रियांनी हजारो वर्षे कुटुंबात आणि समाजात दुय्यम स्थान स्वीकारून एक गुण स्वत:त बाणवला आहे. स्वत:ला जे सांगायचं ते पुरुषवर्गाला खटकणार नाही, अशी खबरदारी घेऊन ‘शर्करावगुंठित’ करून सांगण्याचं कसब त्यांना जमलं आहे.

 
 
या कहाण्या आपल्या अनाम पूर्वज स्त्रियांनी रचल्या, सांगितल्या, ऐकल्या आणि मनोभावे जपल्या. हजार-बाराशे वर्षांपूर्वीचा काळ. बहुतेक सगळ्यांचा पोट भरण्याचा व्यवसाय शेती, पशुपालन आणि बलुतेदारी. एकत्र कुटुंबपद्धती. घरात सासू-सासरे, दीर, जावा, नणंदा... त्यांची मुलंबाळं, शिवाय आते, मामे, मावस अशा नात्यांची माणसं. बहुपत्नीत्वाची चाल, त्यामुळे सवत आणि मत्सरही अटळ होता. पुरुषार्थाच्या कल्पना उथळच होत्या. अक्राळविक्राळपणा, अरेरावी आणि संताप हे पुरुषांचं भूषण मानलं जाई. छोटी छोटी राज्यं होती. जहागिर्‍या, वतनांसाठी होणार्‍या लढायांत पुरुष मारले जात. लढण्यासाठी जास्त पुरुषांची गरज, त्यामुळे ‘अष्टपुत्रा सौभाग्यवती’ ही समाजाची मागणी होती. लढाईत कुणीही जिंकलं तरी दोन्ही बाजूच्या स्त्रियांची हार ठरलेली. स्त्रियांची कौटुंबिक, सामाजिक जबाबदारी म्हणजे मुलांना जन्म देणं आणि सवाष्ण असणं. निपुत्रिक आणि विधवा असणं हा स्त्रियांसाठी गुन्हा होता. मुला-मुलींची लहान वयात लग्न होत. पोटापाण्याच्या व्यवसायासाठी पुस्तकी शिक्षण आवश्यक नव्हतं. अक्षरओळख, भाषा, लिपीवाचन, लेखन याची सामान्यांना गरज नव्हती. त्यामुळे वाचू शकणार्‍या भटजींच्या सांगण्यानुसार पूजा होऊ लागल्या. पूजा सांगून उदरनिर्वाह करणार्‍या भटजींनी सोयिस्करपणे, सौभाग्यासाठी या पूजा आवश्यक असल्याचं सांगून आपला ‘दक्षिणामार्ग’ वहिवाटीचा केला. पण जिथे भटजी नाही, तिथेही या पूजा, परंपरा आणि रिवाजानुसार होत राहिल्या. इतक्या त्या सगळ्या सामान्य स्त्रियांच्या मनीमानसी रुजल्या होत्या.
 
या कहाण्यांतून सामान्य स्त्रियांची सुखदु:खे सांगितली आहेत. इच्छा, आकांक्षा, आशा, निराशा सांगितल्या आहेत. बाईपणाचा कुठलाही ‘वाद’ तयार न करता, आवेश, अभिनिवेश न आणता, बाईपणाचे सगळे आयाम जपले आहेत. नाती-गोती जगली, जगवली आहेत. माहेरला आणि सासरला स्वत:शी जोडून ठेवलं आहे. म्हणूनच या कहाण्या सांगताना, ऐकताना स्त्रिया अंतर्मुख होऊन विचार करत गेल्या, स्वत:ला समजावत गेल्या, शिकवत गेल्या. कहाणीचं मर्म कर्मकांडात गुंडाळून लेकी-सुनांना वसा देत गेल्या. या पूजा बायकांनी एकत्र येऊन करण्याचा रिवाज आहे. हा रिवाजही संवाद आणि मैत्री फुलवण्यासाठीच रुजला.
या सगळ्या पूजांचा हेतू कौटुंबिक स्वास्थ्यासाठी, सौख्यासाठी आहे. मनुष्यप्राण्याच्या उत्क्रांतीचा प्रवास टोळीपासून अनेक टप्पे ओलांडत कुटुंबापर्यंत आला. माणसाच्या मानसिक, शारीरिक, भावनिक स्थैर्यासाठी कुटुंबव्यवस्थाच आदर्श ठरली. त्यात होणारे अपघात कुटुंबाचं आणि समाजाचंही स्वास्थ्य बिघडवतात. आपल्या अनाम पूर्वज स्त्रियांनी, कुटुंबसंस्था, सासर-माहेर, नाती-गोती, भौतिक समृद्धी, स्त्रियांच्या क्षमता आणि मर्यादा यांचं भान ठेवून, मूर्तिपूजेच्या परंपरागत पद्धतीनुसार या पूजांची मांडणी केली. कारण त्या काळात धर्म मूर्तिपूजेच्या कर्मकांडातच अडकून पडला होता.
 प्रज्ञा जयंत बापट
9405501769