एकमुखाने बोला जय जय हनुमान...!

    दिनांक :13-Jul-2019
हनुमंताने आपले आयुष्य रामाच्या सेवेत घालविले. सर्वप्रथम रामदास हे हनुमंतच आहेत. नवविधाभक्तीमधील दास्यभक्ती ही त्यांनी आयुष्यभर आचरणात आणली. हनुमंताने आपली सेवक ही भूमिका उत्कृष्टपणे निभावली. जरी हनुमंत स्वत:ला सेवक समजत असत व या नात्याने प्रभू रामचंद्र त्यांचे मालक होते तरी जर आपण ‘उघडा डोळे, पाहा नीट’ या वाक्प्रचारानुसार चौकशी केली, तर भारतात जितकी मंदिरे प्रभू श्रीरामांची आहेत त्यापेक्षा खूप जास्त मंदिरे ही हनुमंताची आहेत. भक्त हा देवापेक्षा मोठा असतो, याचाच हा प्रत्यय आहे. समर्थ रामदास हेसुद्धा प्रभू श्रीरामाचे नि:सीम भक्त होते. पण, जेव्हा धर्मप्रसाराची वेळ आली तेव्हा त्यांनी राममंदिर न बांधता मारूतीची मंदिरेच बांधली. आजच्या काळातसुद्धा राममंदिर बांधणे किती कठीण काम आहे, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. समर्थांनी त्यांच्या काळात अकरा मारूतीची मंदिरे बांधून धर्मप्रसार केला. कलियुगात हनुमंतभक्ती ही फार श्रेष्ठ आहे. कारण हनुमंत हे बळाचे प्रतीक आहेत. त्यांच्याकडे प्रचंड सामर्थ्य होते. इतके असूनही त्यांनी या प्रचंड बळाचा गैरफायदा घेऊन दुर्बलांना त्रास दिल्याची कुठेच नोंद नाही. मारूतिरायांपासून हेच गुण आपल्याला घ्यावयाचे आहेत. कलियुगात बळ असल्याशिवाय आपण योग्यप्रकारे जीवन जगू शकत नाही. कारण ‘बलिष्ठ अतिजीविता’ या म्हणीप्रमाणे जो बलशाली असेल तो अन्य लोकांपेक्षा जास्त काळ जीवित राहतो, तो आजारी पडत नाही, आपले कर्तव्यकर्म करताना त्याला शीण येत नाही, त्यामुळे त्याची प्रगती लवकर होते. खरे बलशाली हे हनुमंतासारखे सात्त्विक बुद्धीचे असतात. सात्त्विक बुद्धीचे असल्यामुळे झालेली प्रगती ही बराच काळ टिकणारी असते. अशाप्रकारे चांगले जीवन जगण्याकरिता लागणारे गुण आपण हनुमंताकडून घेऊ शकतो.
 
 
आजकाल मंदिरात भक्त लोकांची संख्या वाढलेली असली, तरी डोळस भक्त नसल्यामुळे पूजेचा प्रभाव भक्तांवर होताना दिसत नाही. पूजेच का? केव्हा? व कशी? या मानसशास्त्रीय विज्ञानाची माहिती न घेता, अभ्यास न करता हे भक्त फक्त अंधानुकरण करीत असतात. कोणतेही कार्य समजून, अभ्यास करून केले नाही तर ते कार्य सफल होत नाही, हे सर्वांना माहीत आहे. पूजेबाबत हेच होत आहे. पूजा ही भौतिक वस्तू प्राप्त करण्याकरिता नसून ज्या देवतेची आपण पूजा करतो तिचे गुण ग्रहण करण्याकरिता आहे. ज्या भौतिक वस्तूंची कामना आपण पूजेतून करतो त्या आज आपल्याकडे का नाहीत? तर त्या वस्तू मिळविण्याकरिता ज्या गुणांची आवश्यकता असते ते सध्या आपल्याकडे नाहीत. योग्य गुण आपल्याकडे असते तर त्या वस्तू अपल्याला मिळाल्याच असत्या. देवतांमध्ये आवश्यक गुण असतात म्हणून जी कामं आपल्याला करता येत नाही ती ते करू शकतात आणि संपन्न, आनंदी राहतात. एकदा हे गुण पूजेतून ग्रहण करता आले, आचरणात आणता आले की मनात ज्या ज्या इच्छा, कामना आहेत त्या पूर्ण झाल्याच असे समजा. खरे धर्माचरण हे गणवेशात नसून गुणवेशात आहे, गुणवेशाला, गुणांचा पोषाख धारण करण्यात, गुणांना धारण करण्यात आहे. वेस या संस्कृत शब्दाचा अर्थ प्रवेशद्वार, आत घुसणे असा आहे. म्हणून गुणवेश म्हणजे गुणांना, सद्गुणांना आपल्या आतमध्ये प्रवेश देणे, सद्गुणांना धारण करणे. गणवेशापासून सुरू होऊन धर्माचरण गुण धारण करण्यापर्यंत, गुणांना रोजच्या व्यवहारात आचरणात आणण्यापर्यंत झाले पाहिजे. कारण संसारात पगाराला (उत्पन्नाला) कितीनेही ‘गुणलं’ तरी भागत नाही... ‘गुणानं’ राहता आलं तर भागतं... म्हणून गुण ग्रहण करण्याकरिताच पूजा करावी.
जेव्हा आपण हनुमानभक्ती करतो तेव्हा ती हनुमंताचे गुण ग्रहण करण्याकरिता असावयास पाहिजे. पूजेची क्रिया ही शाळेत जाण्यासारखी आहे. वर्षभर शाळेत गेलो पण लिहिता-वाचता आले नाही तर शाळेत गेल्याचा काय उपयोग? तसेच वर्षभर पूजा केली आणि त्या देवाचे गुण ग्रहण केले नाही तर पूजा केल्याचा काय उपयोग? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात- ‘नित्य पूजितो हनुमंत, व्यसने झाला प्रेता ऐसा।’ (ग्रामगीता-अ.26,ओवी20) म्हणून हनुमंताची खरी भक्ती म्हणजे बलशाली होणे आणि मिळविलेल्या बळाचा सज्जनांचे दुर्जनांपासून रक्षण करण्याकरिता उपयोग करणे. हनुमंताची खरी भक्ती ही मंदिरात नसून आखाड्यात, सूर्यनमस्कारात, व्यायामशाळेत आहे. आरोग्य, बळ कमविण्यात आहे. प्रात:काळी उठून फिरायला जाणे, प्राणायाम, योगासने करण्यात आहे. सात्त्विक आहार घेण्यात आहे, स्वत:मधील दुर्गुण नष्ट करण्यात आहे.
हनुमानाची खरी भक्ती जो रोज करेल त्याल हनुमंताचे आशीर्वाद नक्की लाभतील. एकामुखाने बोला जय जय हनुमान...!
 
चंद्रशेखर पंडित
7875174002