शबाना आझमींचा थयथयाट!

    दिनांक :13-Jul-2019
चौफेर  
 
सुनील कुहीकर  
 
 
नासिरुद्दीन शाह, आमीर खानांची ‘ती’ वादग्रस्त विधाने अद्याप विस्मरणात गेलेली नसताना आणि त्यावरून उठलेले वादळ अजून पुरते शमलेले नसताना, परवा शबाना आझमींनी आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे. असहिष्णुतेच्या मुद्यावरून देशभरात नव्याने रान पेटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या देशात चुकीला चूक म्हणणे गुन्हा झाले असल्याचा, विशेषत: सरकारविरुद्ध काही बोलायला गेलं तर त्याला देशद्रोही ठरविले जात असल्याचा कांगावा केला. परवा इंदूरमध्ये आयोजित एका सत्कार सोहळ्यात बोलताना, स्वत:च्या सत्काराचा मूळ मुद्दा बाजूला ठेवून आझमी मॅडम सरकारवर घसरल्या. देशातले सध्याचे वातावरण फार बदलले असल्याचा जावईशोधही त्यांनी लावला.
 
गत लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त साधून बरोबर काही महिन्यांपूर्वी देशभरात सर्वदूर सहिष्णुतेचा डंगोरा पिटायला काही मंडळी सरसावली होती. त्यांनी बडवलेले ढोल अन्‌ पुरस्कार वापसीची नौटंकी हा त्याचाच भाग होता. लेखक काय, कलावंत काय, डाव्या विचारांची सारीच पिलावळ चवताळून उठली होती त्या वेळी. संधी मिळाली की सरकारवर तुटून पडत होती. निवडणुकीच्या आधी तर, केंद्रातील भाजपा सरकारविरुद्ध त्यांनी असे काही नकारात्मक वातावरण निर्माणे केले होते की वाटावे, बस्स! गेलीच सत्ता भाजपाच्या हातून. पण, निवडणुकीचे निकाल असे काही लागले की, सर्वांच्याच घशाला कोरड पडली. तोंडातून शब्द फुटेनासे झालेत. आता नवे सरकार जरासे स्थिरावू लागले, तर पुन्हा शबाना आझमीसारखे लोक सहिष्णुतेचे तुणतुणे वाजवायला सरसावले आहेत. सांगा, कुणी कधी देशद्रोही ठरवले हो शबाना आझमींना? या देशातले वातावरण इथे राहण्याच्या लायकीचे उरले नसल्याचे सांगत, आपल्याच देशाची निंदानालस्ती करणारे नासिरुद्दीन शाहही इथेच आहेत अजून अन्‌ इथे राहायला भीती वाटत होती, ती आमीर खानची बायकोही देश सोडून गेल्याची वार्ता कानी पडलेली नाही अद्याप. का? जिथे सुरक्षित वाटत नाही, जो देश राहण्याच्या लायकीचा वाटत नाही तिथे ‘पडून’ राहण्याचा अट्‌टहास तरी कशासाठी चाललाय्‌ या शहाण्यांचा? की दुसरीकडे भीक घालत नाही कुणी यांना? आणि शबाना आझमी तरी कोणत्या सहिष्णुतेच्या गप्पा मारताहेत? अरे, त्या राहुल गांधींनी ‘चौकीदार चोर हैं’ म्हणत थेट पंतप्रधानांना टारगेट केले होते निवडणुकीच्या प्रचारकाळात. निवडणुकीतला पराभव सोडला तर कोणती कारवाई झाली राहुल गांधींविरुद्ध? कुणी देशद्रोही ठरवले त्यांना? ज्या देशात, देशाच्या पंतप्रधानांना चोर म्हणण्याची मुभा आहे, तसे म्हणता येईल इतपत लोकशाही अस्तित्वात आहे, तसे म्हणूनही कुणीच कोणतीच कारवाई करीत नाही कुणावरच, मग आझमी मॅडम कोणत्या कारवाईबाबत बोलताहेत? अगदी आताचे त्यांचे बोलणेे संपल्यावरही, मीडिया सोडला तर सरकारी पातळीवर कुणीही दखल घेतलेली नाही त्यांच्या बरळण्याची. कुणीही त्यांना देशद्रोही म्हटलेले नाही. मग वातावरणातील कोणत्या बदलाची बात करताहेत त्या, समाजाला भ्रमित करण्यासाठीचा हा पुढाकार नेमका कशासाठी आहे, कशासाठी चाललाय्‌ हा थयथयाट, समाजात गोंधळ घालण्याचा घाट नेमका कशासाठी घातला जातोय्‌, आपल्या विचारांचा पक्ष सत्तेत नसल्याचा पोटशूळ इतक्या खालच्या स्तरावर जाऊन व्यक्त करावा या कथित शहाण्या मंडळींनी?
 
 
 
कधी देशात सुरक्षित वाटत नसल्याची बडबड, कधी इथले वातावरण चांगले राहिले नसल्याची बतावणी, कधी सहिष्णुता संपत चालली असल्याचा जावईशोध. प्रत्यक्षात कोण नासवतोय्‌ हो देशातले वातावरण? अन्‌ हे कोण शहाणे सांगणार, इथले वातावरण बिघडलेय्‌ म्हणून? कालपर्यंत इतके दंगेधोपे व्हायचे, जातिधर्माच्या नावावर दंगली पेटायच्या, इंदिराहत्येनंतर शिखांना शोधून शोधून मारले गेले, पण ब्र निघाला नाही तोंडून कुणाच्याच. खुद्द शबाना, आमीर, नासिरुद्दीन यांच्यासंदर्भात, त्यांचा धर्म, त्यांचे विचार विसरून लोकांनी एक सच्चा कलावंत म्हणून त्यांना डोक्यावर घेतले, तेव्हा समाज असहिष्णू वाटला नाही त्यांना कधी? तो जरासा खरा बोलू लागला, निर्भीडपणे व्यक्त होऊ लागला, आपली मतं स्पष्टपणे मांडू लागला, कधीकाळी डोक्यावर बसवून ठेवलेल्या या कलावंतांना डोक्यावरून खाली उतरवू लागला, जाब विचारू लागला, चुकलं तर फटकारू लागला, तर एका क्षणात तोच समाज असहिष्णू झाला? सरकारी कारभार ताळ्यावर येण्याची चिन्हे दिसू लागली, तर सरकार चालवणार्‍या लोकांच्या सहिष्णुतेवर यांच्यालेखी प्रश्नचिन्ह उभे झाले लागलीच?
 
आझमी मॅडम, तुम्हाला दु:ख नेमके कशाचे आहे, हे न समजण्याइतके मूर्ख राहिलेले नाही आता कुणीच इथे. राहिला प्रश्न, तुम्हाला तुमच्या देशभक्तीसाठी कुणाच्याच प्रमाणपत्राची गरज उरली नसण्याचा, तर सहिष्णुतेबाबत तुमच्या प्रमाणपत्राचीही इथे कुणालाच गरज नाही, ही बाबही लक्षात ठेवाच एकदा. कालपर्यंत कितीवेळा चिंता निर्माण झाली तुमच्या मनात सरकारविरुद्ध बोलू शकण्याची स्थिती नसल्याबाबत? देशात आणिबाणी लादली गेली, सार्‍या जगादेखत लोकशाहीचा गळा घोटला गेला, तेव्हा चकार शब्द निघाला नाही तोंडून या शहाण्यांच्या अन्‌ आता सारा समाज असहिष्णू झाला असल्याचा साक्षात्कार होतोय्‌ सार्‍यांना? इंदूरच्या कार्यक्रमात इतकी निरर्थक बडबड करून चार दिवस लोटलेत, आझमी मॅडम. कोण दाखल झालं हो दारात तुमच्या? कुणी आक्षेप नोंदवला तुमच्या बरळण्यावर? बोला की सरकारविरुद्ध मनात येईल तसे. अडवलं आहे कुणी तुम्हाला? राहुल गांधींपासून तर ममता बॅनर्जींपर्यंत अन्‌ लेखकांपासून तर कलावंतांपर्यंत सारेच तर उतरले आहेत मैदानात. संघापासून भाजपापर्यंत अन्‌ मोदींपासून सरसंघचालकांपर्यंत सर्वांविरुद्ध गरळ ओकण्याची जणू शर्यत लागली आहे इथे. तरीही समाधान होत नाही म्हणून सत्काराच्या असल्या खाजगी सोहळ्यांचे मंच वापरून सार्वजनिक रीत्या विखार फूत्कारण्याची संधी साधली जातेय्‌. शबाना आझमी, चित्रपटक्षेत्रातील एक अभिनेत्री म्हणून ख्यात आहेत. ‘मंडी’पासून तर ‘मासूम’पर्यंतच्या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांसाठी लोकांनी वाहवा केली त्यांची. अभिनयासाठी कौतुकाची थाप पाठीवर ठेवताना, त्यांच्या विचारांचे डावे-उजवेपणही आडवे आले नाही कधी रसिकांच्या दृष्टीने. एरवी, सामाजिक असो की धार्मिक स्तरावरील त्यांच्या विचारांची दिशा ठाऊक असतानाही रसिकांनी चित्रपटक्षेत्राशी त्याचा संबंध कधी जोडला नाही. इतक्या निरलसपणे जो समाज प्रेम करू शकतो तो समंजस समाज एक दिवस अचानक असहिष्णू ठरावा शबाना आझमींसाठी? त्या, ज्या मंचावरून भाषण देत होत्या, तिथे कॉंग्रेसचे कुख्यात नेते दिग्विजय सिंह उपस्थित होते. त्यामुळे शबाना आझमींच्या बोलण्याचा कल नेमका कोणत्या बाजूने आहे, हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. त्यांना सरकारविरुद्ध बोलावेसे वाटण्याचा अर्थही पुरेसा स्पष्ट आहे. वातावरण वगैरे काही बदललेले नाही. असहिष्णुता वगैरेही वाढलेली नाही. एक मात्र नक्की आहे की, देशात भाजपाचे सरकार सत्तेत आल्यापासून काही लोकांचा पोटशूळ मात्र वाढला आहे. यांच्या मनाविरुद्ध सरकार जसजसे स्थिरावताना दिसते आहे तसतशी या पोटशुळाची तीव्रता अधिक वेगाने वाढते आहे. शबाना आझमींचा परवाचा थयथयाट हा त्याचाच परिपाक आहे...
 
ज्या सरकारच्या काळात थेट पंतप्रधानांना ‘चोर’ म्हणण्याइतपत वातावरण ‘खुले’ आहे, त्या काळात वातावरण बिघडले
असल्याचा आरोप खरंतर मूर्खपणाची साक्ष देणारा ठरावा. तमाम विरोधकांनी निवडणुकीपूर्वी साकारलेला असहिष्णुतेच्या आरोपांचा नाट्यप्रयोग या निमित्ताने नव्याने आरंभण्याचे आणि त्यायोगे समाजातील वातावरण दूषित करण्याचे षडयंत्र तर आझमींच्या वक्तव्यात दडलेले नाही ना, असा प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होतो. तसे असेल तर समंजस समाजाने या धेंडांना खरोखरीच त्यांची जागा दाखवून त्यांचे राजकारण खालसा केले पाहिजे. सहिष्णू समाज, ते म्हणतात तसे खरंच असहिष्णू झाला तर काय घडेल, याचा प्रत्यय यावा ना आरोपकर्त्यांना कधीतरी!
9881717833