वकीलांवर न्यायालयाची प्रतिमा जपण्याची जबाबदारी - न्यायमूर्ती भूषण गवई

    दिनांक :14-Jul-2019
अकोला,
अकोला न्यायालयाला शतकोत्तर वर्षांची परंपरा लाभली आहे. अनेक नामवंत वकीलांनी या न्यायालयात वकीली केली आहे. नावलौकीक असलेल्या अशा या न्यायालयाची प्रतिमा जपण्याची जबाबदारी वकीलांवर असल्याचे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी केले.अकोला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या नवीन अतिरिक्त इमारतीचे उद्घाटन आज करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायमूर्ती रोहीत देव होते. कार्यक्रमाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायमूर्ती रवी देशपांडे, नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती प्रदिप देशमुख, न्यायमूर्ती सुनिल शुक्रे, न्यायमूर्ती जका अ. हक, न्यायमूर्ती विनय देशपांडे, न्यायमूर्ती पुष्पा गणेडीवाला, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश य. गो. खोब्रागडे, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड. महेंद्र शहा आदी उपस्थित होते.

 
न्या. गवई पुढे बोलताना म्हणाले, राज्यात वकील आणि न्यायदानाचे काम करीत असताना अनेक महत्वपूर्ण प्रकरणांमध्ये न्याय देण्याचा प्रसंग आला. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयाचा निकाल देताना अकोला जिल्ह्यातील न्यायमूर्तीसोबत न्याय देण्याचा प्रसंग आला. अकोल्याचे असलेले वल्लभ मोहता यांना आदर्श मानून आपण न्यायदानाच्या क्षेत्रात वाटचाल करीत असल्याचे सांगितले. नागरिकांना कमी वेळेत आणि कमी खर्चात न्याय मिळेल, तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक आणि आर्थिक लोकशाही रूजविण्यासाठी न्यायाधीश आणि वकीलांनी कार्य करावे. अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली
यावेळी बोलताना पालकमंत्री डॉ. पाटील म्हणाले की, न्यायालयांसाठी राज्य शासनाने 1735 कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. यापैकी 700 कोटी रूपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. राज्य शासनाच्या प्रयत्नाने 160 न्यायालयांच्या इमारतींचे बांधकाम हाती घेण्यात आले असून यापैकी 92 इमारती, तसेच 95 निवासस्थाने पूर्ण झाले आहे. न्यायालयातील पुरावे आणि लायब्ररी डिजीटल होण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल.
कार्यक्रमात न्या. देव, न्या. देशमुख, न्या. देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. ॲड. शहा यांनी स्वागतपर भाषण केले. कार्यक्रमापूर्वी न्या. गवई यांच्या हस्ते फित कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली. इमारतीच्या बांधकामात योगदान देणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्षीप्रा महाजन यांनी संचालन केले तर न्या. मोनिका ओर्लाडों यांनी आभार मानले.