तिकडे वारी अन्‌ आपण घरी!

    दिनांक :14-Jul-2019
जाऊन आले का वारीला? की घरातच एकादशी करत फराळ केला. अनेकांना वाटते की आपण एकदा तरी वारीला गेलेच पाहिजे. दरवर्षीचा तो माहोल पाहून असे वाटते. वर्तमानपत्रांत छायाचित्रांसह वार्तांकन येत असते. आजकाल तर वृत्तवाहिन्या उदंड झाल्या असल्याने वारी एक चांगला टीआरपी असणारा इव्हेंटच असतो त्यांच्यासाठी. चलनात असणार्‍या नट-नट्यांना सोबत घेऊन वारीचे वार्तांकन, रीपोर्ताज दिले जात असतात. दरवर्षी तेच आणि तसेच असले तरीही त्याला आपला एक वेगळाच नवतेचा बाज असतो. आता काही ठिकाणी तर गेल्या वर्षीचीच छायाचित्रे अन्‌ दृक्‌श्राव्य फिती दाखविल्या तर काहीच कळत नाही... तरीही ते नवेनवेच वाटते. ‘दिवस रोज तसाच उगवितो पण तो नवाच वाटतो, तोच सूर्य, तेच वारे, तीच फुले, तेच पक्षी अन्‌ तसेच गातात तरीही त्याला नवतेची झळाळी असते. नवा उत्साह असतो, नव्या आकांक्षा असतात. नव्या दिवसाकडून नव्या अपेक्षा असतात...’ बघा वारीचा विषय काढल्यावर कसे प्रवचन प्रसवू लागले. पण हे खरेच आहे की दरवर्षीची वारी वेगळी वाटते. आषाढीला वारी संपली की मग आपण कार्तिकीच्या वारीला नक्की जाऊ, असे वाटत राहते. त्यावेळी दिवाळी सरलेली असते अन्‌ खर्चानं दिवाळं वाजलं असतं. कामं वाढली असतात. त्यामुळे मग पुन्हा पुढच्या वर्षी आपण वारीला नक्कीच जाऊ, असा निर्णय केला जातो. आता चातुर्मास लागला आहे. वारीला नाही गेलात तर असेच चातुर्मासात काही नियम करता येतील.
आषाढी म्हणजे देवशयनी एकादशीपासून चार महिने देव निजतात. त्या काळाला चातुर्मास असे म्हणतात. हे चार महिने खूप प्रकारची व्रतं, वैकल्यं आणि सण असतात. ही एक वेगळी बाब आहे. जगाच्या पाठीवर असे कुठेच नाही. देवांनाही आरामाची गरज असते आणि त्यांना तो दिला पाहिजे, इतर वेळी तर ते सतत मानवाच्या कल्याणासाठी जागे असतात. काहीही झाले की माणसं देवाकडे धाव घेतात. कर्म आपण करतात आणि त्याचे परिणाम आपल्याला हवे तसे येणार नाहीत, असे दिसताच त्याला संकटे समजून देवाकडे धाव घेतात. त्यामुळे देवांना सतत कष्ट पडतात. आपण ज्या देवांना कष्ट देतो त्यांना आरामही देण्याची जबाबदारी आपलीच आहे, या कृतज्ञभावाने देवांनाही निवांत झोप देण्याची ही मानसिकता खूपच वेगळ्या प्रकारचे अध्यात्म प्रकट करणारी आहे. चक्क देवांना निद्राधीन होण्याची परवानगी मानवाने द्यावी अन्‌ स्वत: जागरूक राहून सृष्टीचा सांभाळ करावा, ही अनोखी बाब आहे.

 
 
श्रावणात तर विविध प्रांतात विविध व्रते केली जातात. खाण्या-पिण्यावरही निर्बंध असतात. या काळात वांगी, कांदे, लसूण आणि मांसाहार टाळला जातो. व्यसनांनाही या काळात दूर ठेवण्याची पद्धत आहे. त्यामागे अर्थातच भारताच्या प्राचीन आणि तितक्याच प्रगत वैद्यकशास्त्राचे नियम आहेत. आयुर्वेद हा भारतातील लोकांच्या जीवनप्रवाहाचा एक भाग आहे. ते त्यांच्या दैनंदिन कर्मात निहित आहे. त्यामुळे अगदी आहारापासून उपवासापर्यंत सारेच कसे आयुर्वेदशास्त्रानुसार ठरले आहे. मग त्यांना धार्मिक अधिष्ठान लाभले. तेही लोक धर्म म्हटले की निमूटपणे नियम पाळतात म्हणून नव्हे, तर हे नियम पाळणे हाच आमचा धर्म आहे. तो जितका आध्यात्मिक आहे, तितकाच तो वैज्ञानिकही आहे. खरेतर भारतीय जीवनपद्धतीचे हेच दोन मूलाधार आहेत- अध्यात्म आणि विज्ञान! आपल्या भाषाही खर्‍या अर्थाने दोनच आहेत. एक अध्यात्म अन्‌ दुसरी विज्ञान. बाकी सार्‍या लिपी आहेत. बोली आहेत. भाषा या दोनच. आपण रुढार्थाने कुठल्याही बोलीभाषेत बोलत असलो तरीही या दोन भाषा बोलत असतो. हे दोन वेगळे आहेत, एकमेकांचे शत्रू आहेत, असे धर्ममार्तंडांनी पसरवून आपली पकड समाजावर ठेवण्याचा प्रयत्न अव्याहत चालविला आहे. त्यातून सुटका मिळवली अन्‌ धर्म म्हणजे अध्यात्म नव्हे अन्‌ विज्ञान म्हणजे आधुनिकता नव्हे, हे लक्षात आले तर आपला ज्ञानोबा कळतील, तुकोबारायाही कळतील. ‘नवसे कन्या पुत्र होती, मग का करावे लागे पती’ असे विचारणारे तुकोबाराया विज्ञाननिष्ठ नाहीत, असे कोण म्हणेल?
अमावस्येच्या दिसी िंबबािंबब भेटी येती... असे सांगणारे ज्ञानोबा अध्यात्मपुरुष होते; पण ते विज्ञानापासून दूर होते, हे कसे मानायचे? अध्यात्माच्या वाटेवर वारीला नेताना विज्ञानाच्या राऊळात पुढारलेल्या पांडुरंगांचं दर्शन घडविण्यासाठीच वारी असते. केल्याने देशाटनच शहाणपण येत असते. जगाच्या शाळेत शिकण्यासाठी अन्‌ प्रचंड खोल ग्रंथांसारखी माणसं वाचण्यासाठी वारी असते. माणूस समजून घ्यायचा असेल तर तो पोथ्या, पुराणात नाही समजत, त्यासाठी माणूसच वाचावा लागतो. वारी त्यासाठीच असते. माणूस वाचून माणुसकी समजून घेण्यासाठी. आता चातुर्मासातही विज्ञान आहे. आता कस नसलेल्या अन्‌ कृत्रिम रीत्या वाढविलेल्या भाज्या कुठल्याही ऋतूत मिळतात. फ्रोजन पदार्थांचे फॅडही वाढले आहे. माणसांची गर्दी वाढली, लोकसंख्या वाढली, तशा गरजाही वाढल्या. त्या भागविण्यासाठी मग हे मार्ग चोखाळले जातात. त्यातून अनारोग्यालाच आम्ही हाक देत असतो. आधुनिक काळाच्या जीवनशैलीची गरज म्हणून काही गोष्टी अंगीकारण्यात आल्या. त्यात चूक ते काही नाही, पण त्या अंधपणे अंगीकारणे किंवा आधुनिक जे जे काय आहे ते सगळेच शास्त्रशुद्ध आणि जुने जे काय आहे ते अंधश्रद्धा आहे, त्यामागे वैज्ञानिक दृष्टिकोनच नाही, असे समजले जाते, ते मात्र चूक आहे. कांदा आता चार महिने खायचा नाही. कारण कांदा हा वातकारक आणि थंड प्रवृत्तीचा असतो. उन्हाळ्यात तोच त्याचसाठी खायचा किंवा खावासा वाटतो, कारण त्या काळात शरीराला आतूनही थंडाव्याची गरज असते. त्या काळात घामाने शरीर खूप थकते आणि वात कमी झाला असतो, त्यामुळे वातकारक कांदा खायचा असतो. पावसाळ्यात एकतर कांदा तयार व्हायचा असतो आणि साठवलेल्या कांद्याला काळी बुरशीही चढलेली असते. त्याला एक प्रकारचा वासही असतो. पाणीही जड झालेले असते. त्यामुळे कांदा पचायला जड असतो. म्हणून या काळात कांदा खायचा नसतो. लसूण चालतो, मात्र कांद्यासोबत काही लोकांनी नंतर लसूणही नकाराच्या यादीत टाकला.
आपली संस्कृती कृषीच आहे. कृषिधर्म असे म्हणतात. तो काही कुठल्या जाती आणि धर्माशी जोडलेला नाही. शेती करणारा कुणीही शेतकरी असतो. बारा बलुतेदारीत ती ती कामं अन्‌ ते ते व्यवसाय जातीनुसार, धर्मानुसार वाटले गेले आहेत. लोहार, चांभार, कुंभार, कोळी, माळी... पण शेती मात्र कुठल्या जाती, धर्माची नाही. ज्याने शेती केली तो शेतकरी असतो. कारण कृषी हा स्वतंत्र धर्मच आहे. त्या धर्माचे पालन मातीशी नातं असलेला प्रत्येकच जण करतो. नाहीतर तिकडे मुंबईच्या झगमगाटातही शेतकर्‍याची दु:खं काळजाला कशी भिडली असती? त्यामुळे ग्रामसंस्कृतीत अनेक सण हे सगळ्याच धर्माचे अन्‌ जातीचे लोक पाळतात, साजरे करतात. नागपंचमी हा काही केवळ हिंदूंचा सण राहात नाही. नाग, उंदीर, गरुड, बेडूक, कुत्री, गाय इतकेच नव्हे, तर वाघ, सिंहदेखील आमच्या पूजेचे राहिले आहेत. वटपौर्णिमा, कांदेनवमी, आवळी पौर्णिमा असे सण असतात. कडूिंनबालाही आम्ही देवतांशी जोडले आहे. वड, पिंपळ, कडूिंनब हे ग्रामीण भागात आमच्या हवामानातले वृक्ष पर्यावरणाचे रक्षण करणारे आहेत. त्यांच्या जतनाची आपली परंपरा निर्माण करण्यात आली. त्यामुळे आता एक वारी संपली असली तरीही आयुष्याची वारी अशीच अध्यात्म आणि विज्ञानाच्या वाटेवर चालत रहावी यासाठी या दोन्ही भाषा शिकविणार्‍या वारीमार्गावर आपण चालत राहिले पाहिजे!