गप्पा पेन्शनरांच्या...

    दिनांक :14-Jul-2019
लक्ष्मण कुर्‍हेकर
आम्ही पेन्शनर एके ठिकाणी, ठरावीक वेळी जमतो. मग निरनिराळ्या विषयांवर गप्पा सुरू होतात. त्यातील काही गप्पा...
गंगाधरपंत : ‘‘माझ्या मुलाचं पत्र आलं की मला ‘डिक्शनरी’च पाहावी लागते, एवढं तो अस्खलित इंग्रजीत पत्र पाठवितो!’’ त्यावर प्रतिक्रिया देत माधवराव म्हणाले, ‘‘भाग्यवान आहेस लेका तू. कारण माझ्या मुलाचं पत्र आलं की, मला बँकेचं ‘पासबुक’च पाहावं लागतं!’’ 

 
 
गुणवंतराव : ‘‘आज अस्सं सुनेला खडसावून सांगितलं, ‘मला गरम पाणी पाहिजे म्हणजे पाहिजे.’ अन्‌ तिने लगेच ते करून ठेवलं माझ्या पुढ्यात.’’ ‘‘अरे व्वा, प्रगती दिसतेय तुझी?’’ इति गोिंवदराव. तसे पुढे ते म्हणाले,
‘‘मग काय समजलास होय तू? मी थंड पाण्याने भांडी घासणारच नाही आजपासून, फार त्रास होतोय रे...’’
 
भगवंतराव : ‘‘अगदी लहानपणापासूनच इतकं लाडानं वागवलं मुलाला की, कधी हात नाही उचलला बिचार्‍यावर! अन्‌ आज...’’
‘‘कायऽ काय म्हणतोस!’’ तसे ते पुढे म्हणाले, ‘‘मी स्वत: दोन्ही हात समोर उचलले.’’ ‘‘ते का?’’ ‘‘अरे स्वसंरक्षणार्थ!’’ भगवंतरावांचं उत्तर होतं.
 
शामराव : ‘‘दररोज दोन वाजेपर्यंत जेवणारा मी, आज दहा वाजताच मुलासोबत गरम जेवण करून, भरपेट जेवलोय अन्‌ निघालोय्‌!’’ ‘‘अरे, कुठे गेला होतास? अन्‌ एवढं लवकर जेवण सुनेनं करून दिलय कसं? आश्चर्यच म्हणावं.’’ तसं तेच पुढे म्हणाले, ‘‘कळत नाही का? आज एक तारीख अन्‌ पेन्शनचा दिवस नव्हता का?’’
 
माधवराव : ‘‘अरे काय सांगू, काल आभाळ गडगडलं, नातू घाबरला, त्याला समजावलं अरे, आभाळात म्हातारा ड्रम लोटतोय. त्याचा हा आवाज!’’ तर आज...
नातू म्हणतोय, ‘‘आजोबा, आजही आभाळातून आजोबा ड्रम लोटताहेत एकटेच. तर तुम्ही केव्हा जाणार त्यांच्या मदतीला?’’