मान्सूनचा सूचक 'गोसावी'

    दिनांक :14-Jul-2019
यादव तरटे पाटील
वन्यजीव अभ्यासक, दिशा फाउंडेशन, अमरावती.
 
पावसाची पहिली सर येताच ग्रीष्माचा ताप सरून सृष्टीमध्ये चैतन्य निर्माण होते. कडक तापलेल्या उन्हाळ्यात जंगल शुष्क होऊन जाते. पावसाळा सुरू होणे म्हणजे एक पर्वणीच. उन्हाच्या काहिलीने जीव नकोसा होतानाच, पहिल्या पावसात आपले पाय हळूहळू जवळच्या धबधब्या आणि धरणांकडे वळतात. हिवाळी सहलींपेक्षा बरेच जण पावसाळी सहलीला प्राधान्य देतात. मात्र, आमच्या निसर्गप्रेमींची पावले एका वेगळ्याच दुनियेच्या प्रतीक्षेत असतात. आताच्या शास्त्रीय शोधाच्या, संवर्धनाच्या विचारांची जागा थेट बालपणात घेऊन जाते. बालपणी शेती शिवारात व प्रसंगी जंगलात होणार्‍या या लाल मखमली किड्यांचे दर्शन आजही मनाला प्रचंड आनंद देणारे आहे. 
 
 
मानव, प्राणी, पक्षी, फुलपाखरे, सगळीकडे मृग नक्षत्राचा संकेत देणारा म्हणजेच मान्सूनची नांदी देणारा गोसावी व इतर कीटक आजही दिसतात खरे, मात्र त्यांची धोक्यात येणारी संख्या िंचता वाढविणारी आहे. त्यांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. पर्यावरणात व शेती शिवारात त्यांचे अस्तित्व शेतकर्‍यांच्या फायद्याचे आहे. फुलपाखरे, मधमाश्या, भुंगे, मुंग्या, नाकतोडे, वाळवी इ. जीवसृष्टी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. यातील सर्वात आकर्षक म्हणजे मृगाचा काळा किडा व गोसावी होय. मृगाची सुरवात होताच ग्रामीण भागात काळा किडा दिसतो. त्यावरून मृगाचा पाऊस आहे, असा शेतकर्‍यांना नैसर्गिक संकेत मिळतो.
 
अवकाळी पाऊस व मृगाचा पाऊस यातील फरक या कीटक सृष्टीच्या अस्तित्वातून आपल्या सहज लक्षात येतो. मृगाच्या पहिल्या पावसानंतर ओल्या मातीवर चालणारा, भगव्या रंगाचा अन्‌ धोक्याचा स्पर्श होताच पाय मिटवून चेंडूसारखा गोल करून बसणारा मखमली कीटक आपल्या सर्वांच्या परिचयाचा आहे. ‘रेड वेलवेट माईट’ असे त्याचे नाव असून ग्रामीण भागात त्याला गोसावी किंवा साधू नावानेही ओळखले जाते. काही ठिकाणी त्याला गोगलगाय नावानेही ओळखले जाते. आजही जंगलात फिरताना हा किडा दिसला की आपण गुंग होऊन जातो. प्रत्येकाला आपल्या बालपणात डोकावून पाहण्याची ताकद ठेवणारा हा किडा म्हणजे आठवणींचा खजिना उलगडणारा आहे.
 
 
आजच्या घडीला कृषी-परिस्थितीकीमध्ये वाढते रसायन व औषधामुळे अनेक सूक्ष्मजीव व कीटकांचे जीवन धोक्यात सापडलेले आहे. गेल्या काही वर्षांत शेतीत रासायनिक खते व कीटकनाशके यांचा वाढता वापर यांच्या चक्क जिवावरच बेतत आहे. पहिल्या पावसानंतर शेती व जंगल परिसरात आजही गोसावी हमखास आढळून येतो. हा कीटक अतिशय संवेदनशील असून धोक्याचा स्पर्श होताच एकदम निर्जीव होऊन शांत बसतो. जणूकाही मेलाच आहे की काय असेही भासवतो. कुजलेल्या पानाचे बारीक कण व लहान सूक्ष्मजीव याचे मुख्य खाद्य आहे. याचे आयुष्य अवघे दोन ते तीन महिन्यांचे असते. पावसाळी हंगामापुरते आपले अस्तित्व असणारे हे कीटक दिवसेंदिवस कमी होत आहेत. शेतीसाठी किंवा कोणत्याही पिकासाठी हा धोकादायक नसून हा पूर्णतः निरुपद्रवी आहे. गेल्या काही वर्षांत यांची संख्या झपाट्याने कमी झाली आहे.
 
जमीन भुसभुशीत करणे, जमिनीत सेंद्रिय द्रव्यांचे प्रमाण वाढविणे, पक्ष्यांना खाद्य म्हणूनही भूमिका, अशा अनेक अंगाने हा कीटक महत्त्वाचा आहे. अन्नसाखळीचे अभिन्न अंग असलेला हा कीटक मात्र आता फारसा दिसत नाही. शहरांचे वाढते सिमेंटीकरण तसेच शेती शिवारात वाढता खते आणि रसायनाच वापर अशा दुहेरी कात्रीत हा किडा सापडला आहे. परिसंस्थेतील अन्नजाळ्यात कीटक अतिशय महत्त्वपूर्ण आहेत. कीटक हे पक्षी, साप, सरडे यांचे मुख्य खाद्य आहेत. अन्नसाखळी समृद्ध असेल तरच जैवविविधता समृद्ध राहते. रसायने व वाढता कीटकनाशकांचा वापर जैवविविधतेसाठी जीवघेणा ठरला आहे. तूर्तास तरी या जीवसृष्टीच्या संवर्धनाचा कोणताच अॅक्शन प्लॅन आपल्याकडे नाही. केवळ या समृद्ध सजीवसृष्टीचा विनाश बघणेच आता आपल्या हाती उरले आहे. म्हणून वन विभाग, शहरी नागरिक व शेतकरी बांधवांनी यांच्या संवर्धनासाठी खास पावले उचलणे आवश्यक वाटते.
9730900500
www.yadavtartepatil.com