विहिरीत पडून नऊ रानडुकरांचा मृत्यू

    दिनांक :14-Jul-2019
वन अधिका-यांच्या हलगर्जीपणा कारणीभूत
कठोर कारवाई करण्याची वन्यप्रेमींची मागणी
मोहाडी,
तालुक्यातील महालगाव शेतशिवारातील विहिरीत एकापाठोपाठ एक असे 11 रानडूकरे पडली. या घटनेची माहिती वन अधिका-यांना लगेच देण्यात आली. मात्र वन अधिका-यांनी उद्या बघू असे म्हणून टाळाटाळ केली व दुस-या दिवशी घटनास्थळी भेट दिली. तोपर्यंत 11 पैकी 9 रानडुकरांचा पाण्यात बुडून मृृत्यू झाला होता. वनाधिकाऱ्यांनी कार्यतत्परता दाखवून तत्काळ कारवाई केली असती तर सर्व रानडूकरांचे प्राण वाचविता आले असते.
 

 
 
तालुक्यात रानडुकरांची संख्या वाढली आहे. दोन दिवसापुर्वी महालगाव शेतशिवारात रानडुकरांचा कळप आला असता शेतक-यांनी तो हाकलून लावला. पळता पळता या कळपातील एकामागे एक अशी 11 रानडूकरे शेतातील विहिरीत पडली. शेतक-यांनी लगेच याची माहिती वन अधिका-यांना दिली. मात्र साधन उपलब्ध नसल्याचे कारण सांगून वन अधिका-यांनी वेळ मारून नेली. दुस-या दिवशी वनअधिकारी ताफा घेऊन घटनास्थळावर आले, तोपर्यंत 9 रानडुकरांचा पाण्यात बुडून मृत्यू झालेला होता. तर दोन रानडुकरे जिवंत आढळली. नंतर तेही मरण पावल्याचे समजते. मृत रानडूकरांना होमगार्ड विवेक झंझाड यांनी विहिरीबाहेर काढले. शव विच्छेदन पशुधन अधिकारी डॉ. मनोज नंदेश्वर यांनी केले.
वन अधिका-यांच्या हलगर्जीपणामुळेच सदर रानडुकरांचा मृत्यू झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वन्यप्रेमींकडून होऊ लागली आहे. विशेष म्हणजे येथील होमगार्ड असलेले अमृत झंझाड यांनी रानडुकरे विहिरीत पडल्याने लगेच वनविभागाला याची सूचना दिली होती. यावेळी वनक्षेत्र सहायक धुर्वे, वनमजूर विवेक साखरवाडे, एम.एन. आंबाडरे, मोहतुरे, कारेमोरे, हिरापुरे, तितिरमारे, पाटिल, भीमराव बुराडे, बंडू धारगावे इत्यादी कर्मचारी कार्यालयात उपस्थित असल्याचे सांगण्यात येते.