प्रोस्थेटिक मेकअपमुळं बिग बी चिंतेत

    दिनांक :15-Jul-2019
मुंबई,
बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रपट 'गुलाबो सिताबो'च्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. या चित्रपटात अमिताभ एका वृद्धाची भूमिका साकारतायेत. या चित्रपटातील त्यांच्या लुकसाठी प्रोस्थेटिक मेकअपची मदत घेण्यात आली आहे. प्रोस्थेटिक मेकअपमुळं व्यक्तीचा चेहरामोहराच बदलून जातो. अमिताभ बच्चन यांनी मात्र मेकअपच्या या कौशल्यावर चिंता व्यक्त केली आहे. प्रोस्थेटिक मेकअपमुळं होणारा त्रास त्यांनी ब्लॉगमधून मांडला आहे.
 
 
'प्रोस्थेटिक मेकअप करायला मी नेहमी तयार असतो. मात्र, अतिवापरामुळं प्रचंड थकवा येतो. पाश्चिमात्य सिनेसृष्टीतील काही नियम आहेत. त्या नियमांनुसार प्रोस्थेटिकचा वापर तीन दिवसांपेक्षा जास्त करु शकत नाहीत. जर तुम्हाला पुन्हा प्रोस्थेटिकची गरज लागलीच तर एक किंवा दोन दिवसांचा ब्रेक घ्यावा लागतो. मात्र, आपल्याकडं महिनो्महिने प्रोस्थेटिकचा वापर केला जातो. 'पा' चित्रपटातसुद्धा असंच झालं होतं. मी याबाबत काही तक्रार करत नाहीये. पण, जसे दिवस पुढे जात आहेत तसं हे सांभाळणं कठिणं होत चाललंय.' असं म्हणतं त्यांनी ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.
या लूकमध्ये अमिताभ मोठी दाढी आणि चष्म्यासह एकदम वेगळ्याच अंदाजात दिसत आहेत. तर, अमिताभ बच्चन यांच्यासह आयुष्यमान खुराणादेखील असणार आहे. अमिताभ हे घरमालकाच्या भूमिकेत दिसणार असून आयुष्यमान खुराणा त्यांचा भाडेकरू असणार आहे. अमिताभ आणि दिग्दर्शक शुजित सरकार यांनी यापूर्वी 'पिकू' या चित्रपटात एकत्र काम केले होते.