पर्वतराजीची राणी

    दिनांक :16-Jul-2019
वेदश्री विकास देशपांडे
 
आमचं ध्येय होतं,‘क्वीन ऑफ हिलस्टेशन्स!’ हा मान मिळणार्‍या तामिळनाडू राज्यातील ऊटी उर्फ ‘उदगमंडलम’ या गावी पोहोचण्याचं! म्हैसूर ते उटी हा मार्ग प्रचंड वळणाचा. इथे 36 हेअरपिन वळणे आहेत. ड्रायव्हरच्या कौशल्याची खरोखरीच कसोटी लागते. मध्ये बंदीपूर गावी जंगल सफारी करण्याचीही संधी असतेच. राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराने दर्शन देऊन सर्वांच्या मनात आनंदाचे मोरपीस फुलवले जाऊ शकते. येथे गजराज आपला चित्कार करून सलामी देतो. हरणाचे समूहाचे दृश्य लोभसवाणी भासतेे. या आनंदात अधिकच भर घालावी म्हणून वरूणराजही व्यक्त होतोच. हा अनोखा प्रवास, पण कुठे थकवा जाणवत नाही. 
 
 
प्रचंड मोठे डोंगर, पहाड, वृक्ष, सुचिपर्णी वृक्षांची जंगल पाहून वाटते-काय आहे निसर्गाची किमया भारी! जशी डोळे भरून पाहावी, त्याच्याच रंगसंगतीमध्ये मंद झुळूक हळूच लागावी. ही झाडे, वेली भान हरपायला लावतात. सृष्टीचा हा अनमोल खजिना. त्यात हॉटेलही पहाडातच वसलेले. गुलाबी हवा झुळझुळ वाहते. सकाळी लाटांमधून फेसाळत आलेली सोनेरी पहाट, वार्‍याने हातात मुरली धरावी आणि त्या तालावर ती बेधुंद मने नाचावी. 1825 साली स्थापन झालेल्या ‘बॉटनिकल गार्डन’मध्ये पाऊल ठेवलं. वेगवेगळ्या रंगांची, आकाराची, उंचीची किती-किती फुले. ब्रह्मदेवाने किती विचारपूर्वक सृष्टी निर्माण केली. तीच बाब रोज गार्डनच्या बाबतीतही लागू पडते. नऊ ते दहा हजार गुलाबाची झाडे आणि सोळाशे प्रकारच्या जाती एकच सौंदर्याची व्याख्या स्पष्ट होते. आपल्याच मस्तीत ही पुढे डोळ्यात होती. खळखळून हसत होती. ती फुले जणू संदेश देत होती-
 
फुलं तोडायचे असते काट्यांमधून,
सुख शोधायचे असते दुःखामधून।।
 
इथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा जणूकाही हेवा वाटत होता. कारण किती जवळचं नातं त्यांनी फुलांच्या राजाशी साधलं होतं. फुलांचे सुगंधी अत्तर चोहीकडे पसरलेले भासत होते. मध्येच भ्रमर फुलातील मध चाखत होते. आमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत असेच जणू ते सांगत होते. बोटिंग आणि घोडस्वारीचा आनंद उटी लेक या स्पॉटवर अनुभवता येतो. थ्रेड गार्डन हे येथील आणखी एक वैशिष्ट्य! रंगीत धाग्याच्या सहाय्याने प्रत्येक वनस्पतीचा अभ्यास करून रोपटी तयार केली आहे. यात कुठल्याही सुई, मशीनचा उपयोग न करता केलेली कलाकृती अप्रतिमच!
 
दुसर्‍या दिवशी टॉय ट्रेन वरून कुन्नूरला जाता येतेे. सुंदर डोंगर गंगा, निलगिरीचे जंगल, चहाचे मळे पाहून मन प्रफुल्लित होते. या मळ्यात ठराविक अंतरावर ‘सिल्वर ओक’ची झाडे असतात. ही झाडे लावण्यामागचे कारण म्हणजे पाणी साठवून ठेवते. चहाची फॅक्टरी बघून चहा कसा तयार होतो, त्याची माहिती मिळाली. ‘डॉल्फिन पॉईंट’ म्हणजे डॉल्फिन नोजच्या आकाराचा कडा! ‘स्लीिपिंग लेडी व्यू’ एका झोपलेल्या मदनिकेचा आकार असलेला डोंगर! ‘पैकारा झील’ म्हणजे खळखळणार्‍या पाण्याचा झरा मनाला प्रफुल्लित करतो. हे सारं बघून असं वाटतं की- निसर्गासारखा दुसरा कुणी सोयरा नाही.
• 
9822211335