'बिग बॉस 13'साठी सलमानला मिळणार दोनशे कोटी

    दिनांक :16-Jul-2019
मुंबई,
सालाबादप्रमाणे अभिनेता सलमान खान यंदाही 'बिग बॉस'चं सूत्रसंचालन करणार आहे. बिग बॉसच्या तेराव्या पर्वाचं सूत्रसंचालन करण्यासाठी सलमान किती मानधन घेणार, हे ऐकून तुमचे डोळे विस्फारतील. सलमान संपूर्ण पर्वासाठी जवळपास दोनशे कोटी रुपये घेणार असल्याची माहिती आहे.
 
 
सलमानने 'वीकेंड का वार'च्या प्रत्येक एपिसोडची फी साडेसहा कोटींपर्यंत वाढवली आहे. म्हणजेच दर आठवड्याला सलमान 13 कोटी रुपये घेणार आहे. बिग बॉसचा प्रत्येक सिझन 105 दिवस म्हणजेच 15 आठवडे चालतो. त्यानुसार 195 कोटी रुपयांची कमाई सलमान करणार आहे.
एका आठवड्याला 'वीकेंड का वार'चे दोन एपिसोड शूट केले जातात. दोन्ही भागांचं चित्रीकरण एकाच दिवशी केलं जातं. या एपिसोडमध्ये सलमान 'बिग बॉस'च्या घरातील सदस्यांनी केलेल्या चांगल्या-वाईट कामांचा आढावा घेतो. चांगल्या कामाचं कौतुक आणि वाईट वर्तनावर शब्दाचा मार अशी ही पद्धत असते. गेल्या वर्षी सलमान दर आठवड्याचे अकरा कोटी रुपये घेत होता. यावर्षी मात्र त्याने आपल्या मानधनात वाढ केली आहे. याचाच अर्थ गेल्या पर्वात सलमानने 165 कोटी रुपयांची कमाई केली होती.