साखरा येथे गॅस्ट्रोची साथ; ५७ जणांना लागण

    दिनांक :16-Jul-2019
गडचिरोली, 
येथून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या साखरा या गावी तब्बल ५७ गावकऱ्यांना गॅस्ट्रोची लागण झाल्याची धक्कादायक बाब  आहे.  साखरा हे राज्य महामार्गावरील गाव असून, गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावर आहे. तेथील गावकऱ्यांना १४ हातपंप व ४ विहिरींमधून पेयजल घ्यावे लागते. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पाणी दूषित येत आहे. हे पाणी प्यायल्याने शनिवारपासून काही नागरिकांना हगवण व उलट्यांचा त्रास सुरु झाला. दुसऱ्या दिवशी रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ती ५७ वर पोहचली. घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे यांनी पोर्ला येथील प्राथमिक आरोग्य विभागाचे एक पथक साखरा येथे पाठविले. त्यांनी रुग्णांवर उपचार केले. आता सर्वांची प्रकृती स्थिर आहे.
 
 
दरम्यान, संबंधित यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी साखरा येथील हातपंप व विहिरींच्या पाण्याचे नमुने नोव्हेंबर २०१८ पासून घेतलेले नाही. त्यामुळे गावकऱ्यांना गॅस्ट्रोसारख्या आजाराला बळी पडावे लागत आहे. दोषी कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पंचायत समिती उपसभापती विलास दशमुखे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.