परिवर्तन पॅनलचे सर्वेसर्वा सुरेंद्रसिंह चंदेल भाजपाच्या वाटेवर

    दिनांक :16-Jul-2019
कुरखेडा,
जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय असलेले परिवर्तन पॅनलचे सर्वेसर्वा सुरेंद्रसिंह चंदेल आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे लोकसभा निवडणुकीत भाजपा उमेदवारास दिलेला जाहीर पाठिंबा नंतर भाजपा नेत्यांशी वाढलेली सलगी व नुकतीच गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची घेतलेली भेट कारणीभूत समजली जात आहे.
 
 
आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी चंदेल यांनी आपल्या राजकीय आयुष्याची कधी पर्वा केली नाही शिवसेनेला एकदा नाही तर दुसऱ्यांदा जय महाराष्ट्र करून स्वतःची परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून जिल्ह्यात कार्यकर्ते व समर्थकांची मोठी फळी उभारून स्वतःचे राजकीय अस्तित्व कायम ठेवनारे चंदेल आता सत्तारूढ असलेल्या भाजपा मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
 
याबाबत सुरेंद्रसिंह चंदेल यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आपण लवकरच परिवर्तन पॅनलच्या पदाधिकारी व कार्यकर्त्याची बैठक बोलविण्यात येणार असून या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगितले.